Maharashtra Assembly Election 2024 | केवळ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून शासनाने कमविले किमान 43 लाख 62 हजार रुपये जादा

October 30, 2024

पुणे : Maharashtra Assembly Election 2024 | निवडणुकीला उभे राहणार्‍या सर्व उमेदवारांना आपल्या संपत्तीचे व आपल्यावरील दाखल गुन्ह्यांचे प्रतिज्ञापत्र उमेदवारी (Assembly Candidate Affidavit) अर्जाबरोबर सादर करावे लागते. केवळ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून राज्य शासनाने किमान ४३ लाख ६२ हजार रुपये जादा उत्पन्न कमविले आहे. हे केवळ उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत आहे. याशिवाय अनेकांनी उमेदवारी अर्ज घेऊन गेले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी कागदपत्रे जुळविली. प्रतिज्ञापत्रे तयार करुन ठेवली. पण, काही कारणाने उमेदवारी मिळाली नाही़ अथवा वरिष्ठ नेत्यांच्या दबावामुळे ऐनवेळी ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही, त्याची यात मोजदाद नाही.

उमेदवारांना आपल्या संपत्तीचे व गुन्हेगारी विषयक प्रतिज्ञापत्र यापूर्वी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करता येत होते. परंतु, काही महिन्यांपूर्वी शासनाने १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर रद्द करुन आता सर्व प्रकारचे प्रतिज्ञापत्रे ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करण्याची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे सर्वांना ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आपले प्रतिज्ञापत्र करावे लागले आहे.

राज्यात २८८ जागांसाठी तब्बल ७ हजार ९९५ उमेदवारांनी एकूण १० हजार ९०५ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या सर्व अर्जाबरोबर ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र जोडले आहे. ते पाहता उमेदवारांनी स्टॅम्प पेपरवर किमान ५४ लाख ५२ हजार रुपये खर्च केले. यासाठी पूर्वी केवळ १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर लागत असल्याने केवळ १० लाख ९० हजार रुपये खर्च करावे लागले असते. परंतु, त्यात ४०० रुपयांची वाढ झाल्याने प्रत्यक्षात ४२ लाख ६२ हजार रुपये जादा खर्च करावे लागले. त्यामुळे केवळ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून शासनाने जादाचे ४२ लाख ६२ हजार रुपये कमाविल्याचे दिसून येत आहे.