Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीत महायुतीचं जागावाटप कसं होणार? अजित पवारांनी सांगितला फॉर्म्युला

August 8, 2024

नाशिक: Maharashtra Assembly Election 2024 | राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरु केलेली आहे. दरम्यान महायुतीत जागावाटपाचा (Mahayuti Seat Sharing) काय फॉर्म्युला असणार याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केले आहे.

अजित पवार म्हणाले, आमच्या तीनही पक्षांकडे ज्या-ज्या जागा आहेत त्या-त्या जागा त्यांच्याकडे ठेवल्या जातील. पण जर काही सिटींग जागा बदलायच्या असतील तर त्याही प्रकारची तयारी आणि मानसिकता तिन्ही पक्षांनी आणि मित्र पक्षांनी ठेवली आहे. आता लवकरच त्याला अंतिम स्वरूप दिलेले आपल्या पाहण्यात येईल, असे त्यांनी म्हंटले आहे.

आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची (Ajit Pawar NCP) जनसन्मान यात्रा सुरु होत आहे, याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, काँग्रेस पक्षाने ही जनसमान यात्रा सुरू केली आहे. आजपासून आम्ही जास्तीत जास्त मतदारसंघात जाण्याचा प्रयत्न करत आहोत. महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना महत्त्वाच्या योजना अर्थसंकल्पामध्ये आम्ही सादर केलेल्या आहेत.

त्याबद्दलची माहिती आम्हाला शेतकऱ्यांना बहि‍णींना, मुलींना, युवा वर्गाला द्यायची आहे. काल अल्पसंख्यांकांसाठी मार्टीची स्थापना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करण्याची आमची भूमिका आहे. शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेतून आम्ही पुढे जात आहोत, असे त्यांनी सांगितले.