Maharashtra Assembly Election 2024 | ‘अब की बार 200 पार’ महायुतीच्या नेत्याचा दावा, म्हणाले – ‘विधानसभेला महायुतीने दिलेला उमेदवार…’

August 14, 2024

नाशिक: Maharashtra Assembly Election 2024 | पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसला. या निवडणुकीत मिळालेले अपयश झटकून आता नव्या दमाने आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असे महायुतीचे नेते कार्यकर्त्यांना सांगत आहेत.

“लोकसभेला झाले गेले ते आता विसरून जा. आता आपला पक्ष महायुती असून, पदाधिकाऱ्यांनी स्वत: उमेदवार समजून विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा. तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांप्रमाणेच कार्यकर्तेही आपापसातील मतभेद, मनभेद विसरून एकत्र आल्यास विधानसभा निवडणुकीत महायुतीला २०० जागा मिळाल्याशिवाय राहणार नाही”, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena Eknath Shinde) नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केला.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती तर्फे राज्यात ‘एकजूट महाराष्ट्र अभियान’ राबविण्यात येत असून, याअंतर्गत येत्या ३० ऑगस्ट रोजी नाशिकमध्ये महायुतीचा महामेळावा आयोजित करण्यात आल्याची माहितीही सामंत यांनी यावेळी दिली.

उदय सामंत म्हणाले. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी संघटित होऊन विरोधकांकडून सोशल मीडियाद्वारे पसरविल्या जाणाऱ्या अफवांना सडेतोड उत्तर द्यावे. राज्यात एका पक्षाच्या नेत्यावर टीका झाली, तर त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रभर रान पेटवले. त्या पक्षापेक्षा आपली ताकद अधिक आहे. आपणही आपल्या नेत्यावर टीका केली तर महाराष्ट्र कसा पेटवू शकतो हे दाखवून देण्याची गरज आहे, असे आवाहन सामंत यांनी मनसेचे (MNS) नाव न घेता केले.

ते पुढे म्हणाले, महायुतीने दिलेला उमेदवार मग तो कुठल्याही पक्षाचा असला तरी त्याला निवडून आणण्याचा संकल्प प्रत्येक कार्यकर्त्याने करावा. यासाठी एकजूट महाराष्ट्र अभियान आयोजित करण्यात आले असून, राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार हा संदेश या अभियानाच्या माध्यमातून राज्यभर दिला जाणार आहे. या अभियानांतर्गत येत्या ३० ऑगस्टला नाशिकमध्ये होणारा महामेळावा ऐतिहासिक ठरावा, यासाठी सर्वांनी संघटित होऊन प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सामंत यांनी सांगितले.

उत्तर महाराष्ट्रातील महायुतीच्या नेत्यांची समन्वय समितीची बैठक नाशिकमध्ये सोमवारी (दि.१२) बोलविण्यात आली होती. या बैठकीला मंत्री उदय सामंत यांच्यासह पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse), खासदार स्मिता वाघ (Smita Wagh), शिवसेना नेते सचिन जोशी (Sachin Joshi), नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal), योगेश टिळेकर (Yogesh Tilekar), अनिकेत तटकरे (Aniket Tatkare), देवयानी फरांदे (Devayani Farande), ऍड. राहुल ढिकले, सरोज अहिरे, या आमदारांसह पदाधिकारी उपस्थित होते.