Maharashtra Assembly Election 2024 | ‘मोदी, शहा जेवढे जास्त महाराष्ट्रात येतील त्याचा मविआलाच फायदा’, काँग्रेस नेत्याचं वक्तव्य ; म्हणाले – ‘त्यांना पैसे देणारे एटीएम मशीन वाचवण्यासाठी…’
मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकेमकांवर टीका करताना दिसत आहेत. दरम्यान भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने (BJP Leader) आगामी विधानसभेसाठी महाराष्ट्रात विशेष लक्ष दिले आहे. त्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शहा (Amit Shah) हे महाराष्ट्राकडे एटीएम म्ह्णून पाहतात. हे त्यांना पैसे देणारे एटीएम मशीन वाचवण्यासाठी ते शेवटचा प्रयत्न करत आहेत. परंतु मोदी, शहा जेवढे जास्त महाराष्ट्रात येतील त्याचा फायदा महाविकास आघाडीलाच होईल या शब्दात पटोले यांनी खोचक टीका केली आहे.
माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, “भाजपा-शिंदे सरकार लाडकी बहिणी योजनेचा (Ladki Bahin Yojana) मोठा गवगवा करत आहे. जाहिरबाजी करून कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात एका वर्षांत ६४ हजार मुली, महिला बेपत्ता आहेत. यावर सरकारने खुलासा करावा. खरेच या सरकारला बहिणी लाडक्या आहेत का? का फक्त मतांसाठीच त्यांना लाडकी बहीण दिसत आहे.
महिला बेपत्ता प्रकरणी विधानसभेत प्रश्न उपस्थित केले असता राज्य सरकारने त्याचे उत्तर देणे टाळले तसेच बेपत्ता महिलांचा प्रश्न जेव्हा जेव्हा विधानसभेत मांडला तेव्हा राज्याचे गृहमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पळ काढला. सरकार लाडकी बहीण म्हणते आणि भंडाऱ्यामध्ये डब्बे वाटपाच्या कार्यक्रमात महिलांवर पोलीस लाठीचार्ज करतात. महिलांना मारण्याचा अधिकार देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिला आहे का? भाजपा शिंदे सरकार हे महिला विरोधी आहे, महिलांवर अत्याचार करणारे सरकार आहे”, या शब्दांत नाना पटोले यांनी निशाणा साधला.
ते पुढे म्हणाले, दरम्यान, “लव्ह जिहाद, व्होट जिहाद अशा प्रकारची वक्तव्ये राज्याचा गृहमंत्री करत आहेत, हे अत्यंत लाजिरवाणे आहे. हे त्यांचे व्यक्तिगत मत नाही तर ते गृहमंत्री म्हणून बोलत आहेत. व्होट जिहाद म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी समतेच्या मुल्याचा अपमान केला असून त्यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी.
महाभ्रष्ट महायुतीचे अडीच वर्षातील अपयश आणि भ्रष्टाचार झाकण्यासाठी फडणवीस आणि महायुतीकडून अशा प्रकारची धार्मिक तणाव निर्माण करणारी वक्तव्ये केली जात आहेत पण राज्यातील सुज्ञ जनता याला बळी पडणार नाही”, असे पटोले यांनी म्हंटले आहे.
Comments are closed.