Maharashtra Assembly Election 2024 | 2019 च्या तुलनेत यंदा भाजपचे जास्त उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; पडद्यामागून भाजपची वेगळीच व्यूहरचना

October 31, 2024

पुणे: Maharashtra Assembly Election 2024 | राज्याची सामाजिक, आर्थिक, राजकीय घडी विस्कटली आहे. शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या पक्षात बंड झाल्यानंतर नवी राजकीय समीकरणे तयार झाली आहेत. महायुती (Mhayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) यंदा सामना रंगणार आहे. मविआ मध्ये काँग्रेस (Congress), शिवसेना ठाकरे गट (Shivsena Thackeray Group) आणि राष्ट्रवादी शरद पवार गट (Sharad Pawar NCP) सहभागी आहे तर महायुतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट (Shivsena Shinde Group) आणि राष्ट्रवादी अजित पवार गट (Ajit Pawar NCP) सहभागी आहे.

२०१९ च्या निवडणुकीत भाजपचे राज्यातील २८८ पैकी १६४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्या तुलनेने यंदा भाजप १५ जागा कमी लढवत आहे परंतु पडद्यामागून भाजपा असा डाव खेळत आहे ज्यातून मागील वेळपेक्षाही भाजपा यंदा निवडणुकीत जास्त जागा लढवत असल्याचे दिसून येत आहे.

महायुतीचा फॉर्म्युला (Mahayuti Seat Sharing Formula) पाहता यंदा भाजपा १४८ जागा लढवत आहे, त्यांचा मित्रपक्ष शिंदे यांचा शिवसेना ८५ जागांवर तर अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष ५१ जागांवर निवडणूक लढवत आहे. याशिवाय भाजपाने आपल्या कोट्यातील चार जागा महायुतीच्या छोट्या मित्रपक्षांना दिल्या आहेत.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने शिवसेनेसोबत युती करून निवडणूक लढवली होती. भाजपाने १६४ जागांवर उमेदवार उभे केले होते तर शिवसेनेने १२४ जागांवर निवडणूक लढवली होती. यावेळी भाजपाने केवळ १४८ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. भाजपा गेल्या निवडणुकीच्या तुलनेत १५ कमी जागा लढवत असलं तरी त्यांनी त्यांच्या १६ नेत्यांना शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देऊन डाव टाकला आहे.

भाजपाने आपल्या १६ नेत्यांना वेगळ्या पक्षातून निवडणुकीत उतरवले आहे. त्यामुळे भाजपा २०२४ मध्ये १६४ जागांवर आपले नशीब आजमावत आहे. भाजपा नवीन ट्रेंड फॉलो करत आहे. भाजपाने आपल्या मित्रपक्षांना जागा देऊन सन्मान राखला आहे आणि आपल्या मित्रपक्षांच्या त्या जागांवर आपले नेते उभे करत आहेत. एकीकडे भाजप आपल्या मित्रपक्षांना त्यांच्या इच्छेनुसार जागा देऊन सांभाळत आहे आणि दुसरीकडे त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवून नेत्यांशी समतोल राखत आहे.

त्यामध्ये भाजपा नेते व माजी केंद्रीय मंत्री नाराणय राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे, भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव, भाजप नेते राजेंद्र गावीत, विलास तरे, संतोष शेट्टी, मुरजी पटेल, अमोल खताळ, शायना एन सी, अजित पिंगळे, दिग्वीजय बागल, विठ्ठल लंघे आणि बळीराम शिरसकर हे नेते शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढणार आहेत. तर राजकुमार बडोले, प्रताप पाटील चिखलीकर, निशिकांत पाटील आणि संजय काका पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर लढणार आहेत.