Maharashtra Assembly Election 2024 | राज्यातील 50 लाख मतदार असलेल्या ख्रिस्ती समाजाचा महाविकास आघाडीला पाठिंबा
पुणे: Maharashtra Assembly Election 2024 | राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला हे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) अशी प्रामुख्याने लढती पाहायला मिळणार आहेत. दरम्यान राज्यातील ५० लाख मतदार असलेल्या ख्रिस्ती समाजाने महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. (Christian Voters Support MVA)
मागील ७५ वर्षांपासून ख्रिश्चन समाजाचा केवळ मतदानासाठी वापर केला गेला. एकही नेता विधिमंडळात पाठविण्यात आलेला नाही. परिणामी, राज्यातील ५० लाख मतदार असलेला ख्रिस्ती समाज कायम मागासलेला राहिला.
समाजातील योग्य व्यक्तींना विधानसभा, विधान परिषदेवर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संधी, वेगवेगळ्या महामंडळांवर तसेच अल्पसंख्याक मंडळावर प्रतिनिधित्व आणि समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी पंडिता रमाबाई यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती या मुद्द्यांच्या पूर्ततेचे आश्वासन मिळाल्यामुळे राज्यातील ख्रिश्चन समाजाने महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
ख्रिश्चनांनी समाज म्हणून संघटित होण्याचा निर्धार केला आहे. समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमवेत चर्चा करण्यात आली. समाजाच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यामुळे महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे विजय बारसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आगामी महापालिका निवडणुकीमध्ये ख्रिश्चन समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्यात आले नाही तर पाठिंब्याचा फेरविचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
Comments are closed.