दापोली : बहुजननामा ऑनलाईन- आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर असताना शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. रामदास कदम हे भगतगिरी करत असून जादूटोणा करण्यासाठी बंगाली बाबांना सोबत घेऊन फिरतात असा आरोप शिवसेनेचे दापोली विधानसभेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर केला आहे. एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. इतकेच नाही तर, विरोधी पक्ष नेते पदासाठी कदम यांनी आमच्यासोबत भगत पाठवला होता. असेही दळवी म्हणाले.
‘सूर्यकांत दळवींच्या हाकालपट्टीची मागणी करणार’ : कदम
विधानसभा निवडणुकीआधीच शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि माजी आमदार सूर्यकांत दळवी यां दोन नेत्यांमधील वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे कदम यांनी सांगितले आहे की, ते सूर्यकांत दळवी यांची सेनेतून हाकालपट्टी करण्यासाठी मागणी करणार आहे.
‘दळवींवर 10 कोटींचा दावा दाखल करणार’
रामदास कदम म्हणाले की, “सूर्यकांत दळवी माझी बदनामी करण्यासाठी पत्रकार परिषदेत मी जादूटोणा करतो असे म्हणाले आहेत. त्यांचे विधान मी गांभीर्याने घेतले असून लवकरच त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे. पक्षाविरोधी काम करणाऱ्या सूर्यकांत दळवी यांची शिवसेनेतून हाकालपट्टी करण्याची मागणी मी पक्ष श्रेष्टींकडे करणार आहे.” असे ते म्हणाले. पुढे कदम म्हणाले की, “कावीळ झालेल्या माणसाला जग पिवळेच दिसते. तसेच सूर्यकांत दळवी यांचे झाले आहे. सध्या त्यांना सगळीकडे रामदास कदम दिसत आहे. माझ्यावर आरोप केल्याबद्दल त्यांच्यावर 10 कोटींचा दावा दाखल करणार आहे.” असेही त्यांनी स्पष्ट केले.
काय म्हणाले होते सूर्यकांत दळवी ?
सूर्यकांत दळवी म्हणाले होते की, “रामदास कदम हे भगत आणि जादूटोण्यावाले आहेत. दर अमवस्येला ते भगतगिरी करतात. ते बंगाली बाबांना घेऊन फिरतात. त्यांनी विरोधी पक्षनेता बनण्यासाठी आमच्यासोबत भगत पाठवला होता. कदम यांनी दापोली मतदारसंघात घुसखोरी करू नये. कदम यांनी पक्षाच्या विरोधात काम केले आहे. त्याचे पुरावेही माझ्याकडे आहेत. त्यांनी पराभव झालेल्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी.” असे अनेक गंभीर आरोप त्यांनी रामदास कदम यांच्यावर केले होते.