मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये युती झाली. मात्र, तिकीट मिळाले नसल्याने दोन्ही पक्षातील नेत्यांनी मोठ्या प्रमाणात बंडखोरी केली. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर युतीमध्ये फूट पडली आहे. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार धनंजय बोडारे यांच्यासह कल्याण-डोंबिवली महापालिकेतील 18 नगरसेवक आणि उल्हासनगरमधील 10 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे.
जागा वाटपानंतर कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून इच्छूक असलेले धनंजय बोडारे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. बंडखोरी करुन उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचे आवाहन पक्षश्रेष्ठींकडून करण्यात आले होते. तसेच काल झालेल्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्यांना तिकीट मिळाले नाही त्यांची मी माफी मागतो, त्यांनी युतीच्या उमेदवारांचे काम करावे असे आवाहन केले होते.
मात्र, आमच्यामुळे पक्ष अडचणीत येऊ नये यासाठी धनंजय बोडारे आणी 28 नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. जागावाटपामध्ये कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला असून येथून गणपत गायकवाड यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ भाजपला सोडल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते आणि स्थानिक नगरसेवकांसह पदाधिकारी नाराज झाले होते. या मतदारसंघातून उल्हासनगर महानगरपालिकेचे शिवसेनेचे विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
Visit : bahujannama.com