मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मराठी येत नसून हिंदीत बोलण्यास सांगणार्या एअरटेल कंपनीच्या कर्मचार्याला मनसेने धडा शिकवला. मुंबईतील कांदिवली परिसरातील चारकोपमध्ये असलेल्या एअरटेलच्या गॅलरीमध्ये हा प्रकार घडला. हा संपूर्ण प्रकार मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांनी फेसबुकवरून शेअर केला आहे.
महाराष्ट्रातच का हा परप्रांतीयांचा मुजोरपणा सहन करायचा? इथली राज्यभाषा ही मराठी आहे. येथे राहणार्या प्रत्येकाला ती बोलता आलीच पाहिजे. महाराष्ट्रात राहून मला मराठी बोलता येत नाही तुम्ही हिंदीत बोला हे चालणार नाही. दुकानांचे बोर्ड मराठी केले. त्यात काम करणार्यांना मराठी यायलाच हवी, असेही कदम म्हणाले. दरम्यान, हा संपूर्ण प्रकार ग्राहकाकडून अधिकचे पैसे घेतल्यामुळे सुरू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. नियमानुसार तुम्ही कोणालाही राज्यात राज्यभाषेचा वापर न करता हिंदीत बोलायला लावणे चुकीचे आहे. आमच्या बोरिवली विधानसभेतील महाराष्ट्र सैनिकांना तातडीने चारकोप येथील एअरटेल गॅलरीमध्ये त्या युवकासोबत पाठवले. तिथल्या कर्मचार्यांनी सुरुवातीला असे काहीही न घडल्याचे सांगितले व महाराष्ट्र सैनिकांशी सुरुवातीला उद्धटपणे वर्तन केले. शेवटी मनसे काय हे कळल्यावर मात्र सर्व गोष्टी कबूल केल्या व माफी मागितली. तिथल्या कर्मचार्याने सरते शेवटी सर्व कर्मचारी मराठीत बोलतील व त्यांना मराठी भाषा शिकवण्यात येईल याचे आश्वासन दिले, असेही कदम म्हणाले.