अलीराजपूर : वृत्तसंस्था – बलात्कारपीडित अल्पवयीन मुलीला आरोपीसोबत बांधून त्यांची धिंड काढण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील जोबट पोलिस ठाण्याच्या हद्दीत (जि. अलीराजपूर) रविवारी (दि. 28) ही खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पीडितेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोबट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात रविवारी हा प्रकार घडला. अल्पवयीन मुलीवर शेजारील गावातील तरुणाने बलात्कार केला. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाइकांनी पीडिता आणि आरोपी तरुणाला एकाच दोरीने बांधून गावातून धिंड काढली होती. दरम्यान गावातील काही तरुणांनी या घटनेचा व्हिडिओ काढला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी गावात धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. पीडितेने तक्रार दिल्यानंतर आरोपी तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, पीडितेच्या कुटुंबीय आणि नातेवाइकांविरोधात दुसरा गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही गुन्ह्यांतील आरोपींना पोलिसांनी अटक केली असून कारवाई सुरु केली आहे.