बहुजननामा ऑनलाईन – एका 8 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येचा छडा लावण्यात मध्य प्रदेशच्या इंदुर पोलिसांना यश आले आहे. या हत्याकांडातील गुन्हेगार दुसरे कुणी नसून महिलेचा पोलीस अधिकारी पती आणि त्याचे दोन भाऊ असल्याचे समोर आले आहे. मृत महिलेचा पती 34 व्या बटालियन कंपनीचा कंमाडर आहे. तर तिचा दीर एक पोलीस आहे. इंदुरच्या मल्हारगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या आठवड्यात ही खळबळजनक घटना घडली होती.
पूजा उर्फ जान्हवी जितेंद्र अस्के असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मल्हारगंज पोलिसांनी मृत महिलेचा पती जितेंद्र अस्के, दीर राहुल अस्के आणि नवीन यांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरच्या कमला नेहरू कॉलनीतील रामदुलारी अपार्टमेंटमध्ये पूजाची गळा दाबून हत्या झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पुजा ही जितेंद्रची दुसरी पत्नी होती. यावरून त्यांच्या घरात काही दिवसांपासून वाद सुरू होते. हत्येनंतर पोलिसांनी आधीच संशयावरून पूजाच्या दोन्ही दिरांना अटक केली होती. पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, हा सगळा खुलासा झाला. या हत्येचा पूर्ण प्लॅन तिच्या पतीने केला होता. जितेंद्रने दोन लग्ने केली होती. त्याचे पहिले लग्न धारच्या अन्नू सोबत झाले होते. तिच्यापासून त्याला मुलेही आहेत. त्यानंतर त्याने इंदुरमध्ये पूजासोबत दुसरे लग्न केले होते. पूजाला जेंव्हा याची माहिती मिळाली तेंव्हा तिने थेट अन्नूला फोन करून तिच्यासोबत भांडण केले. त्यानंतर पहिली पत्नी अन्नूने जितेंद्रला मुलांसहीत आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यामुळे वैतागलेला जितेंद्र धारला पोहोचला. धारमध्ये आधीच जितेंद्रचा पोलीस असलेला भाऊ राहुल हजर होता. तो छिंदवाड्यात तैनात आहे. तसेच त्याच्या मावशीचा मुलगा नवीनही तिथे होता. याठिकाणी तिघांनी पूजाला संपवण्याचा प्लॅन केला. यानंतर जितेंद्र, राहुल आणि नवीन इंदुरला पोहोचले. त्यांनी शनिवारी रात्री पूजाची गळा दाबून हत्या केली. पोलिसांनी राहुल आणि नवीनला अटक केली. मात्र तो सुरुवातीपासून स्वतःला निर्दोष सांगत होता. मात्र चौकशी दरम्यान राहुल आणि नवीन यांनी सगळा खुलासा केला. अशाप्रकारे या हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले.