नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशच्या राजगडच्या कलेक्टर निधी निवेदिता यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा भारतीय जनता पार्टीचा नेता बद्रीलाल यादव यास अटक करण्यात आली आहे. महिला कलेक्टरविरूद्ध असभ्य भाषेचा वापर केल्याने त्यास अटक करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी राजगड जिल्ह्यातील ब्यावरामध्ये एका सभेत बोलताना बद्रीलाल यादव यांनी राजगड कलेक्टरबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांनी म्हटले की, मी जे बोलतोय ते चुकीचे समजू नका, परंतु एक गोष्ट माझ्या मनात आली म्हणून बोलत आहे. कलेक्टर काँग्रेसवाल्यांना मांडीवर घेऊन दूध पाजते आणि भाजपावाल्यांना थप्पड मारते.
राजगड जिल्ह्यातील ब्यावरामध्ये सभेला संबोधित करताना भाजपा नेता बद्रीलाल यादवने राजगड कलेक्टरबाबत हे आक्षेपार्ह विधान केले होते. धक्कादायक गोष्ट म्हणजे या सभेत कैलाश विजयवर्गीय, माजी मंत्री मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, राकेश सिंह आणि विरोधी पक्ष नेता गोपाळ भार्गव सारखे मध्यप्रदेशातील भाजपाचे मोठे नेते सहभागी झाले होते.
बद्रीलाल यादवच्या या वक्तव्यावर काँग्रेसने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. याप्रकरणी ब्यावरा पोलिसांनी एसडीएम संदीप अष्ठाना यांच्या तक्रारीनंतर केस दाखल केली.
थप्पड मारणारावर कारवाई नाही
भाजपा नेत्याच्या अटकेनंतर माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, आता एक प्रश्न अजून निर्माण झाला आहे, बद्रीलाल यादव यांच्यावर कारवाई तर झाली, पण थप्पड मारणारावर कोणतीही कारवाई झाली नाही? आई, मुलगी आणि बहिणीच्या नात्याचा आम्ही सन्मान करतो. परंतु, कायदा फक्त सामान्य लोकांसाठी आहे का? कायदा पदावर बसलेल्या लोकांसाठी नाही का? कारवाई सर्वांवर का नाही ? थप्पड मारणारांवर कारवाई का झाली नाही ?
शिवराज सिंह चौहान म्हणाले, काँग्रेसचे सरकार मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी कारवाई करत आहे. बद्रीलाल यांनी खेद व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, त्यांचा हेतू हा नव्हता. आम्ही महिलांचा सन्मान करतो, परंतु कोणत्याही अधिकार्यास कुणाला थप्पड मारण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही.