भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील भोपाळच्या 32 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअरची अमेरिकेतील सेंट लुइसमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. दरम्यान कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अमेरिकेतच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शरीफ रेहमान असे हत्या झालेल्या इंजिनीअर तरुणाचे नाव आहे. तर कोल जे मिलर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
स्थानिक मीडियाच्या रिपोर्टनुसार, आरोपीचे शरीफच्या मैत्रिणीवर एकतर्फी प्रेम होते. गेल्या बुधवारी शरीफ रेहमान हा युनिव्हर्सिटी सिटी अपार्टमेंटमध्ये जखमी अवस्थेत आढळला होता. त्याची मैत्रीणही याच अपार्टमेंटमध्ये राहते. शरीफला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला. शरीफचा मोठा भाऊ मुकीम याने सांगितले की, माझ्या लहान भावाची सेंट लुइसमध्ये गोळ्या घालून हत्या झाली आहे. मला केवळ इतकीच माहिती मिळाली आहे. युनिव्हर्सिटी सिटी पोलिसांनाी याबाबत माहिती घेण्यासाठी फोन केला होता. मात्र, त्यांनी एसओपीचा हवाला देतानाच याबाबत माहिती देण्यास नकार दिला. शरीफ रेहमान याची आई आणि भाऊ भोपाळच्या सुभाष नगर परिसरात राहतात. शरीफवर अमेरिकेतच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. शिकागोमध्ये भारतीय राजदूतांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच शरीफ काम करत होता, त्या कंपनी व्यवस्थापनानेही सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन शरीफच्या कुटुंबीयांना दिले आहे.