नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अखेर विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजित बच्चन यांच्या हत्येचा खुलासा पोलिसांनी केला.या हत्येच्या कटाच्या मागे इतर कोणीही नव्हते तर रणजितची दुसरी पत्नी आणि तिचा प्रियकर हेच होते. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. स्मृती ही रणजितची दुसरी पत्नी आहे. या दोघांमधील घटस्फोटाचे प्रकरण मिटत नव्हते. यामुळे स्मृती नाराज झाली होती. यावेळी तिने मित्रासमवेत कट रचला. रणजित बच्चन यांची दुसरी पत्नी स्मृती त्यांच्यावर नाराज असल्याचे सांगत लखनौ पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा केला. दोघेही वेगळे झाले होते. परंतु त्यांच्यातील घटस्फोटाचा निकाल मिटला नाही. तर स्मृतीला दुसर्याशी लग्न करायचे होते. पण घटस्फोटाची केस मिटत नसल्याने तिला लग्न करता आले नाही. मग या दोघांनी कट रचायला सुरुवात केली.
रणजितला मार्गातून काढण्याचा विचार तिने केला. या कामात तिने मित्राशी संगनमत केले आणि त्याच षड्यंत्रांतर्गत १ फेब्रुवारी रोजी लखनौच्या हजरतगंज परिसरातील ग्लोबल पार्क जवळ दुचाकीस्वारांनी रणजित बच्चन यांना गोळ्या घालून ठार केले. तेव्हापासून हे प्रकरण पोलिसांसाठी एक आव्हान होते. अनेक पोलिस पथके या प्रकरणाचा तपास करत होते. हत्येच्या तपासादरम्यान पोलिसांनी 70 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यानंतर हे लक्षात आले की स्मृतीचा मित्रही या हत्येमध्ये सामील होता. सध्या पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे.
काय आहे प्रकरण ?
रणजित बच्चन यांना 1 फेब्रुवारी रोजी दुचाकीस्वार हल्लेखोरांनी डोक्यात गोळी घातली होती. हजरतगंज परिसरातील ग्लोबल पार्कजवळ ही घटना घडली. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. बच्चन यांना तातडीने लखनऊ ट्रॉमा सेंटर येथे दाखल करण्यात आले व तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. घटनेच्या वेळी त्याच्यासोबत असलेला त्याचा छोटा भाऊ आदित्य यालाही गोळ्या घालण्यात आल्या. या हत्येनंतर दोन पीआरव्ही पोलिस, एक हवालदार आणि चौकी प्रभारीसह चार पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. पोलिसांनी खुनाच्या संशयिताचे सीसीटीव्ही फुटेजही जाहीर केले आणि कोणत्याही संशयिताचा पत्ता लागल्याबद्दल माहितीसाठी 50,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले. विशेष म्हणजे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हिंदु समाज पक्षाचे नेते आणि हिंदू महासभेचे माजी सदस्य कमलेश तिवारी यांना लखनौच्या नाका भागात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केले होते.