बहुजननामा ऑनलाईन टीम – प्रेयसीला रात्री भेटायला जाणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. विरह सहन न झाल्याने हा प्रियकर प्रेयसीला भेटायला तिच्या गावी गेला. मात्र मुलीच्या घरच्या लोकांनी त्याला पकडून ठेवले. त्यानंतर गावकर्यांनी त्याची धुलाई केली. ही मारहाण येवढी जास्त होती की त्यात हिरा कुमार याचा मृत्यू झाला. तर प्रेयसीच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करणार्या एका युवकालाही गावकर्यांनी मारहाण केली. त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून प्रकृती गंभीर आहे.
शेखपूरा गावची ही घटना असून हीराचे तेथील एका मुलीवर प्रेम होते. मात्र मुलीच्या कुटुंबीयांचा त्याला विरोध होता. ते मुलीला घराच्या बाहेर जाऊ देत नव्हते. त्यामुळे अनेक दिवस त्यांची भेट झाली नाही. त्यामुळे तिला रात्री भेटायचे या उद्देशाने तो गेला होता. रात्री उशीरा तो मुलीच्या घराजवळ आला होता.
त्याची कुणकूण कुटुंबीयांना लागताच घरातल्या काही लोकांनी हिराला पकडले असता इतरही गावकरी जमा झाले. त्यांनी बेदम मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलाच्या कुटुंबीयांनी गुन्हा नोंदवला असून पोलिसांनी काही लोकांना ताब्यातही घेतले आहे.|