Loni Kalbhor Pune Crime News | कुवेतमधील नागरिकाने बंगल्याच्या बेडरुममध्ये फरशी खाली ठेवलेल्या तिजोरीतून 14 लाखांचे दागिने चोरीला

February 4, 2025

पुणे : Loni Kalbhor Pune Crime News | मुळचे बंगलोरचे असलेले कुवेतमध्ये नोकरी करतात. त्यांनी लोणी काळभोरमध्ये बंगला बांधला आहे. बंगल्यातील बेडरुममध्ये फरशी खाली त्यांनी तिजोरीत सोने ठेवले होते. चोरट्याने बंगल्यात प्रवेश करुन नेमकी तिजोरी असलेली फरशी काढून तिजोरीतील १४ लाख ७२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत स्टीफन विक्टर वलेरयण लासराडो (वय ५१, रा. रेल्वे कोलस वस्ती रोड, तरड) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २९ जानेवारी रोजी रात्री साडेअकरा ते १ फेब्रुवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या दरम्यान घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टीफन हे मुळचे बंगलोर येथील राहणारे आहेत. ते कुवेत येथे नोकरी करतात. त्यांनी काही वर्षापूर्वी लोणी काळभोरजवळ बंगला बांधला. कुवेतवरुन काही दिवस मुक्कामासाठी ते येथे येत असतात. कुवेतवरुन येताना नियमानुसार जितके शक्य असते तितके सोने, सोन्याचे दागिने घेऊन ते येतात. बंगल्यात कोणी नसल्याने त्यांनी सोन्याच्या सुरक्षेसाठी मास्टर बेडरुममधील बेडच्या फरशी खाली खड्डा खोदुन तयार केलेल्या तिजोरीमध्ये स्टीलच्या डब्यात सोन्याचे दागिने ठेवले होते. ते बाहेर गेले असताना कोणीतरी घराचा दरवाजा उघडून आत आला. त्याने घरातील मास्टर बेडरुममधील बेडच्या फरशीचे खाली खड्डा खोदून ठेवलेल्या तिजोरीतील स्टीलच्या डब्यातील १४ लाख ७२ हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले.

ही चोरी कोणीतरी परिचतातील व्यक्तीने केली असल्याचा पोलिसांचा संशय आहे. पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव तपास करीत आहेत.