लातूर : बहुजननामा ऑनलाइन – शतायुषी राष्ट्रसंत, वसुंधरारत्न डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य नेतृत्वाखाली आज लातुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क (टाऊन हॉल) येथे दुसऱ्या लिंगायत धर्म महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती लिंगायत धर्म महासंमेलन संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली.
लिंगायत धर्मास स्वतंत्र संवैधानिक मान्यता देण्यात यावी व लिंगायतांना अल्पसंख्याकांचा दर्जा देण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी या महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी निलंगा येथे पार पडलेल्या पहिल्या लिंगायत धर्म संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. स्वतंत्र लिंगायत धर्म मान्यतेसाठी जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर इष्टलिंग पूजा आंदोलन करण्यात आले होते. तसेच शतायुषी राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या दिव्य नेतृत्वाखाली लातुरात ऐतिहासिक असा महामोर्चा काढण्यात आला होता. मात्र समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. या धर्मसंमेलनात याबाबत विचारविनिमय होणार आहे.