नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवाणे हे भारतीय लष्कराचे पुढील प्रमुख असतील. ३१ डिसेंबर रोजी जनरल बिपिन रावत हे सेवानिवृत्त होतील, त्यानंतर लष्कराची कमांडर लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवाणे हे असतील. नरवाणे यांनी आपले शालेय शिक्षण पुण्यातील जनाना प्रबोधिनी प्रशाला येथून पूर्ण केले. नरवणे हे राष्ट्रीय रक्षा अकादमी, पुणे आणि भारतीय सैन्य अकादमी, देहरादूनचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी मद्रास विद्यापीठ, चेन्नईमधून संरक्षण अभ्यासात पदव्युत्तर पदवी आणि इंदूरच्या देवी अहिल्या विद्यापीठातून संरक्षण आणि व्यवस्थापन विषयात एमफिल पदवी घेतली आहे.
नरवाणे यांनी 1 डिसेंबर २०१७ ते ३० सप्टेंबर २०१८ या कालावधीत जनरल ऑफिसर कमांडिंग-इन चीफ, आर्मी ट्रेनिंग कमांड म्हणून काम पाहिले. काश्मीर आणि ईशान्य भारतातील बंडखोरीविरोधी कारवायांचा त्यांना बराच अनुभव आहे. जम्मू – काश्मीरमध्ये त्यांनी नॅशनल रायफल बटालियन आणि इन्फंट्री ब्रिगेडची जबाबदारी संभाळलेली आहे. नरवाणे श्रीलंकेत शांती मिशन दलाचा देखील हिस्सा राहिलेले आहेत. ते तीन वर्षांपासून म्यानमारमधील भारतीय दूतावासात भारताचे संरक्षण संलग्न आहेत.
नरवाणे २०१७ मध्ये प्रजासत्ताकदिनानिमित्त परेड कमांडर देखील होते. त्यांचा जून, १९८० मध्ये सिख लाइट इन्फेंट्री रेजीमेंटच्या सातव्या बटालियनमध्ये देखील समावेश होता. सेनेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे अडचणीच्या काळात काम केल्याचा मोठा अनुभव आहे. त्यांना जम्मू काश्मीरमध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल सेना पदक देखील देण्यात आलेले आहे.त्यांना नागालँडमध्ये आसाम रायफल्सच्या महानिरीक्षक पदाच्या कामगिरीबद्दल विशिष्ट सेवा मेडल मिळालेले आहे. प्रतिष्ठित स्ट्राइक कोरची जबाबदारी सांभाळल्याबद्दल देखील नरवाणे यांना अतिविशिष्ट सेवा मेडल ने सन्मानित करण्यात आलेले आहे. तसेच नरवाणे यांना परम विशिष्ट सेवा मेडल ने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे.
Visit : bahujannama.com