मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सध्याच्या काळात सुरक्षित भविष्यासाठी जीवन विमा हा खूप महत्त्वाचा आहे. आयुर्विमा क्षेत्रातील भारतीय जीवन विमा कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (LIC) ग्राहकांसाठी नेहमीच खास योजना आणत असते. आताही LIC ने ग्राहकांसाठी जीवन उमंग ही खास योजना आणली आहे. 90 दिवस ते 55 वर्षे वयोगटातील लोकांसाठी ही एक एन्डॉयमेंटसह जीवन विमा योजना आहे.
LIC ची जीवन उमंग योजना ही वयाच्या 100 वर्षांपर्यंत कव्हर करते. या पॉलिसीच्या मॅच्युअरिटीची रक्कम 100 वर्षे पूर्ण झाल्यावर मिळेल. जर पॉलिसीधारकाचा अचानक मृत्यू झाला तर त्याने भरलेला सर्व प्रीमियम नॉमिनीला मिळणार आहे. यात प्रीमियम पेमेंट कालावधीनंतर विमाराशीच्या 8 टक्के रक्कम आयुष्यासाठी किंवा 100 वर्षे वयापर्यंत दिली जाते. जर एखाद्याने वयाची 100 वर्षे पूर्ण केली तर कंपनी एकरकमी रक्कम विमाधारकास देईल. इतकेच नाहीतर वयाच्या 100 व्या वर्षी पॉलिसीधारकास सम अॅश्युअर्ड, सिंपल रिव्हर्शनरी बोनस आणि अंतिम एडिसन बोनस मिळेल.
ग्राहकांना 15, 20, 25 आणि 30 वर्ष वयापर्यंत या योजनेचा फायदा घेता येईल. तुम्हालाही जर यात गुंतवणूक करायची असेल तर यासाठी किमान 2 लाख रुपयांचा विमा घ्यावा लागेल. या योजनेचे खास वैशिष्ट्य म्हणजे 80 सी अंतर्गत तुम्हाला 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या प्रीमियमवर आयकरामध्येही सूट मिळणार आहे. समजा तुम्ही 25 वर्षांचे असाल आणि 25 वर्षांच्या कालावधीसाठी 2 लाखांचा विमा घेतला असाल तर तुम्हाला 25 वर्षे प्रीमियम भरावा लागेल. म्हणजेच वर्षाकाठी 8400 रुपये. 25 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याला दरवर्षी एकूण ठेवींपैकी आठ टक्के रक्कम मिळणे सुरू होईल. ही रक्कम 16 हजार रुपये असेल. तुम्हाला हे 99 वर्षे मिळणार आहे आणि 100 वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्हाला 21 लाख रुपये दिले जातील.