मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, असा सनसनाटी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. पण ज्या लेटरबॉम्बमुळे एवढी मोठी खळबळ उडाली आहे, त्या पत्रावरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाकडून शंका उपस्थित केली होती. पण यावर आता खुद्द परमबीर सिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना परमबीर सिंग म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेले पत्र माझ्याच ई-मेल आयडीवरुन पाठवले आहे. सिंग यांच्या या प्रतिक्रियेनंतर आता राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. आता यावर सीएमओ कार्यालयाकडून काय स्पष्टीकरण येतेय हे पाहावे लागणार आहे.
The letter to Maharashtra CM was sent from my email ID, says Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh
— ANI (@ANI) March 21, 2021
दरम्यान परमबीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत इमेलवर शनिवारी (दि. 20) दुपारी 4.37 वाजता पत्र प्राप्त झाले आहे. paramirs3@gmail.com या ईमेल पत्त्यावरून परम बीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ईमेल पत्ता तपासून पाहण्यात येत आहे. तसेच परमबीर सिंग यांना गृहविभागामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. वास्तविक पाहता परमबीर सिंग यांनी अधिकृतरीत्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीसाठी दिलेला वैयक्तिक ईमेल पत्ता parimbirs@hotmail.com असा आहे. त्यामुळे आज प्राप्त झालेला ईमेल तपासून घेणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले होते. पण परमबीर सिंग यांनी माझ्याच ई- मेल आयडीवरून हे पत्र पाठवल्याचे सांगत सीएमओ कार्यालयाची शंका दूर केली आहे.