लासलगाव : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे गेल्या १३ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात बंद असलेल्या १५ बाजार समित्या सुरु झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर आशियातील कांद्याची सर्वात मोठी बाजार समिती लासलगावमध्ये कांद्याचे लिलाव सुरु झालेत. बाजार समित्यांमध्ये आजपासून कांद्याचे लिलाव पुर्ववत सुरू झाल्याने आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. येथील मुख्य बाजार आवारावर ४९७ वाहनातील कांदा लिलाव जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या आदेशानुसार कोरोना कोव्हीड चे नियम पालन करून सकाळी सत्रात लिलाव पार पाडण्यात आले आहेत. आज उन्हाळ कांद्याला कमाल १६३५ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.
लासलगाव बाजार समितीने रविवारी कोरोना चाचणीस सुरवात केली असुन सोमवारी सकाळ पर्यंत लासलगाव येथील ६९२ विंचुर येथील २६९ तर निफाड येथे २६० व्यक्तींचे चाचणी अहवाल असे एकुण १२२१ व्यक्तींचे कोरोना कोव्हीड अहवाल करण्यात आले आहे अशी माहीती लासलगाव बाजार समिती सभापती सौ. सुवर्णा जगताप व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली.
लासलगाव बाजार समितीत आज केवळ पाचशे कांदा घेऊन येणारे वाहनांनाच प्रवेश देत येत असल्याने प्रवेशद्वाराबाहेर सुमारे दोन किलोमीटर अंतरावर ट्रॅक्टर्सच्या रांगा लागल्या होत्या. कोरोना अहवाल पाहुनच आतामध्ये केवळ नोंदणी केलेल्या वाहनाना प्रवेश दिला जात होता. बाजार समिती सचिव नरेंद्र वाढवणे, सुनील डचके, संदिप होळकर, प्रकाश कुमावत, डी. पी. होळकर, गोरख विसे, गणेश आहेर, संदिप निकम, शेजवळ यांच्यासह कर्मचारी यांनी ही तपासणी करून वाहने मध्ये सोडली. या अगोदर बाजार समितीचे वतीने बाजार आवारावरील कांदा ट्रॅक्टर्सवर सॅनेटरायझर्सची फवारणी करण्यात आली.प्रवेशद्वारावर वाहनाची नोंद नंबर नसलेल्या वाहनांना आत घेण्यात आले नाही.
लासलगाव येथे ४९७ वाहनातील १०३३७ क्विंटल कांद्याचे लिलाव होऊन उन्हाळ कांद्याला किमान ७००,कमाल १६३५ तर सरासरी १४०१ रूपये प्रतिक्विंटल भाव जाहीर झाला.