पाटना : वृत्तसंस्था – बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडीचे नेते लालू प्रसाद यादव यांची तब्बल ३.७ कोटींची बेहिशेबी संपत्ती प्राप्तिकर विभाग जप्त करणार आहे. जप्त करण्यात येणाऱ्या संपत्तीमध्ये लालूंच्या पाटण्यातील काही घरांचा देखील समावेश आहे. लालू प्रसाद यादव हे सध्या चारा घोटाळा प्रकरणी जेलमध्ये आहेत.
लालू यादवांची संपत्ती जप्त होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही मोठ्या प्रमाणात त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. दिल्लीतील बंगले आणि शेल कंपन्याही यावर्षी जप्त करण्यात आल्या आहेत. पाटण्याच्या जयप्रकाश नारायण विमानतळाजवळ लालू यादवांच्या मालकीच्या काही इमारती आहेत. या इमारतींची मालकी बेकायदेशीर असल्याचं आयकर विभागाच्या पाहणीत स्पष्ट झालं आहे. त्यामुळे या इमारती जप्त करण्यात येणार आहेत. बिहार आवामी कोऑपरेटिव्ह बँकमधील लालू प्रसाद यादवांच्या कोट्यावधींच्या ठेवीही जप्त करण्यात येणार आहेत.
एकीकडे लालू प्रसाद यादव यांची संपत्ती मोठ्या प्रमाणात जप्त होत असतानाच दुसरीकडे त्यांचे पुत्र आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी त्यांच्या कार्यकाळात उपमुख्यमंत्र्यांना देण्यात येणाऱ्या सरकारी बंगल्यात तब्बल ४४ एसी लावल्याचा आरोप भाजप नेते सुशील मोदी यांनी केला आहे. ४४ एसी लावत सामान्य जनतेच्या पैशाचा अपव्यय केल्याचा आरोप सुशील मोदी यांनी केला आहे. फक्त ४४ एसीच नाही तर ५९ लाखांचं फर्निचरही सरकारी खर्चाने विकत घेतल्याचंही सुशील मोदींनी सांगितलं आहे.
लालूंची संपत्ती जप्त केल्याने त्यंच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. या बेहिशोब मालमत्ते प्रकरणी त्यांच्यावर आणखी काही केसेस सुरु आहेत. तर पुर्वग्रह दुषित मताने ही कारवाई केल्याचे आरजेडीचे नेते सांगत आहेत.