बहुजननामा ऑनलाइन – कोरोनामुळे राज्यभरात ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. त्यातच राज्यातील 80 टक्के ऑक्सिजन उत्पादकासह विक्रेते हे कोकण आणि पुणे विभागातील आहेत. दिवसेंदिवस ऑक्सिजनची मागणी अचानक वाढल्याने मर्यादित वाहतूक व्यवस्थेमुळे वितरणात अडचणी येत असल्यामुळे विलंब होत असल्याचे दिसून आले आहे.
राज्यात ऑक्सिजनचे 24 उत्पादक आणि 66 विक्रेते असून त्यांच्याकडून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येतो. यातील 80 टक्के हे कोकण आणि पुणे विभागात आहेत. राज्यभरात ऑक्सिजनची मागणी वाढली असली तरी वितरणासाठी वाहतूक व्यवस्था उत्पादक आणि विक्रेते मर्यादित आहेत. त्यामुळे ऑक्सिजनचा साठा शिल्लक असला तरी मागणीच्या प्रमाणात पुरवठा करण्यात अडचणी येत असल्याचे काही उत्पादकांनी सांगितले. वाडा, भिंवडी, पालघर या ठिकाणी दरदिवशी सुमारे पाच ते सहा हजार घनमीटर ऑक्सिजनचा पुरवठा करतो. चाकणहून ऑक्सिजनच गेल्या काही दिवसांपासून मिळत नसल्याने मोठया प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. परवा तर मालच न आल्याने दिवसभर व्यवसाय बंद ठेवावा लागला. तसेच दरही दुप्पट वाढले आहेत. पूर्वी जवळपास 12 रुपये प्रतिघनमीटर दराने मिळत होता. परंतु गेल्या महिन्यापासून हेच दर 25 रुपयांवर पोहचले असल्याची माहिती वितरकाने दिली. दरम्यान, राज्यात दरदिवशी 1 हजार 12 टन ऑक्सिजनची निर्मिती केली जाते. सध्याची ऑक्सिजनची आवश्यकता 870 मेट्रिक टन आहे. त्यामुळे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा नाही. याउलट दरदिवशी पुढील दोन ते तीन दिवस पुरेल इतका साठा दरदिवशी शिल्लक असतो, असे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले.