Krishnarao Bhegade Passes Away | मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन; वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणे : Krishnarao Bhegade Passes Away | मावळ विधानसभेचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे सोमवारी रात्री निधन झाले. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज (१ जुलै) त्यांचा अंत्यविधी पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
शिक्षणमहर्षी मावळ भूषण या उपाधींचा सार्थ मान मिळविलेले कृष्णराव भेगडे हे १९७२ मध्ये मावळ विधानसभेतून जनसंघाच्या तिकिटावर पहिल्यांदा आमदार झाले. १९७७ मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नंतर ते १९७८ ला पुन्हा विधानसभेवर निवडून आले. २००० मध्ये त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली. विधानसभा आणि विधानपरिषद असे चार टर्म आमदार राहिलेले भेगडे राजकारणातून निवृत्त झाले. मात्र, अखेरपर्यंत ते शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ राहिले.
दरम्यान, जनसंघापासून सुरू झालेल्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी दोन वेळा विधानसभेवर मावळचे प्रतिनिधित्व केले. शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले, विद्यार्थ्यांसाठी शाळा, महाविद्यालये उघडले. त्यांच्या याच कार्यामुळे आणि लोकसेवेमुळे त्यांना शिक्षणमहर्षी, मावळ भूषण या उपाधींनी ही सन्मानित केले गेले. आपल्या संयमी नेतृत्वामुळे आणि कार्यक्षमतेमुळे ते सर्व पक्षीय नेत्यांमध्ये आदराचे स्थान राखून होते. कृष्णराव भेगडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून कार्यरत होते. संघाच्या विचारसरणीवर आधारित भारतीय जनसंघ पक्षात त्यांनी राजकारणाची कारकीर्द सुरू केली होती.