पुणे : बहुजननामा ऑनलाईन – बांधकाम व्यावसायिकास बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन 2 कोटी रुपये आणि भूखंडाची मागणी केली. या प्रकरणात माहिती अधिकार कार्यकर्त्याला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी तिघांना गजाआड केले आहे.
विशाल शिवाजी ढोरे (वय 36), अस्लम मंजूर पठाण (वय 24, दोघे रा़ मांजरी, हडपसर) आणि सिद्धार्थ महिंद्र डांगी (वय 28, रा़ उत्कर्ष सोसायटी, कात्रज) अशी या तिघांची नावे आहेत.
याबाबत सुधीर कर्नाटकी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कोथरुड पोलिसांनी पत्रकार देवेंद्र जैन, संबंधित महिला आणि बडतर्फ पोलीस हवालदार शैलेश जगताप यांना अटक केली होती़ त्यांना जामीन मंजूर झालाय. मात्र, या गुन्ह्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बर्हाटे, अमोल चव्हाण हे फरार आहेत.
कोथरुड पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये या तिघांनी बर्हाटे यांना पळून जाण्यास मदत करण्यात आली आहे. त्यांना नवीन सीम कार्ड खरेदी करुन दिले गेले. तसेच हे तिघे आणि बर्हाटे हे 8 जुलै रोजी लक्ष्मी कॉलनीमध्ये भेटले. तेथून त्यांनी बर्हाटे यांना सोलापूर येथे नेले. तेथे अमोल नावाच्या व्यक्तीच्या घरात ठेवल्याचे समोर आले आहे. तिघांना मंगळवारी न्यायालयात हजर केले होते.
बर्हाटे यांचा ठावठिकाणा या तिघांना माहिती आहे. त्यांना पनवेल, लोणावळा आणि सोलापूर या ठिकाणी या तिघांनी लपविल्याचे समोर आले आहे. त्यासाठी वापरलेली वाहने जप्त करायच्या आहेत, यासाठी पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली़ न्यायालयाने तिघांना 29 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मालकीहक्क नसताना शहरातील विविध ठिकाणी जमीन विक्रीस उपलब्ध आहेत, असे सांगत 20 लाख रुपयांची फसवणूक केली. प्रकरणात बडतर्फ पोलिस शैलेश जगतापसह प्रकाश फाले यांची दोन दिवसांसाठी (23 जुलैपर्यत) पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.