पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोथरूडमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा 26 हजार मताधिक्याने विजय झाला आहे. कोथरूडमध्ये भाजपविरुद्ध मनसे अशी थेट लढत झाली. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात मनसेने किशोर शिंदे यांना उमेदवारी दिली होती. किशोर शिंदे यांना आघाडीनेही पाठिंबा दिला होता. तर दीपक नारायण शामदिरे यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली होती. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यापासून कोथरूड मतदारसंघ चर्चेत होता.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते हे जनतेतून निवडून आले पाहिजेत, असा आग्रह धरला होता. त्यामुळे पाटील यांनी ‘सुरक्षित’ मतदार संघ शोधत थेट कोल्हापूर येथून पुण्यात प्रवेश करत सर्वांत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या कोथरूड येथून निवडणूक लढवली. कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत. मात्र ते स्थानिक उमेदवार नसल्याने त्यांच्या उमेदवारीला सुरुवातीपासूनच स्थानिकांचा विरोध होता. भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कोथरुडकरांनी अखेर चंद्रकांत पाटील यांच्या बाजूने कौल दिला आहे.
2009 मध्ये शिवाजीनगरमधून वेगळा होऊन कोथरूड मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर कोथरूडमधून शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे निवडून गेले.
त्यांनी मनसेच्या किशोर शिंदेंना पराभूत केलं होतं. 2009 मध्ये शिवसेना आणि भाजपची युती होती. मात्र 2014 मध्ये युती झाली नव्हती. 2014 च्या निवडणुकीत भाजपच्या मेधा कुलकर्णी यांनी शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे यांचा पराभव केला.