बहुजननामा ऑनलाईन टीम : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी समन्स बजावण्यात आले आहे. कोरेगाव भीमा आयोगाकडून हे समन्स बजावण्यात आले असून 4 एप्रिलला आयोगासमोर हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. 2018 मध्ये पुण्यातील भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराची कारणे आयोगाकडून तपासली जात असून त्याच पार्श्वभूमीवर हे समन्स बजावण्यात आले आहे. यावेळी पवारांची साक्ष नोंदवली जाणार आहे.
कोरेगाव भीमा आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांनी शरद पवारांची साक्ष नोंदवली जाणार असल्याचे याआधी सांगितले होते.
पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यात त्यांनी कोरेगाव भीमाबद्दल काही माहिती दिली होती. त्यानंतर पवारांची साक्ष नोंदवण्याची मागणी आयोगाकडे करण्यात आली होती. त्यानंतर अॅड. प्रदीप गावडे यांनी कोरेगाव भीमा प्रकरणी पवार यांची तात्काळ साक्ष घेण्यात यावी, अशी मागणी आयोगाकडे केली होती. तसा अर्ज त्यांनी चौकशी आयोगाकडे केला होता. त्यानंतर आयोगाने शरद पवारांना चौकशीसाठी बोलवण्याचा निर्णय घेतला होता.
म्हणून होणार पवारांची चौकशाी
एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा प्रकरणासंदर्भात शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेउन दंगलीत संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांची नावे घेतली होती. आजुबाजूच्या खेड्यात संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांनी फिरुन वेगळं वातावरण निर्माण केले असं पवार म्हणाले होते. त्यावरून पवारांना या दंगलीबद्दलची ही माहिती कोठून मिळाली. त्यांच्याकडे आणखी काय माहिती आहे ? याबद्दल त्यांची तातडीनं साक्ष घेण्यात यावी, अशी मागणी अॅड. प्रदीप गावडे यांनी केली होती.