कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – जुन्या वादातून इचलकरंजी येथील भाजपच्या नगरसेविका नेहा हुक्किरे यांचे पती विनायक हुक्किरे यांच्यावर चार ते पाच अज्ञात व्यक्तीने धारधार शस्त्राने प्राणघातक (ichalkaranji- bjp-woman-corporators-husband-attacked) हल्ला केला. हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी एका संशयितास पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले आहे. पोलीस अन्य आरोपींच्या शोधात आहेत.
नेहा हुक्किरे या भाजपच्या नगरसेविका आहेत. त्यांचे पती विनायक व इतर काही जणांमध्ये गेल्या आठवड्यात वाद झाला होता. या वादातूनच हा हल्ला झाल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, विनायक हुक्किरे हे शनिवारी रात्री उशिरा जेवणासाठी एका हॉटेलमध्ये गेले होते. इचलकरंजी-कोल्हापूर रोडवरील हॉटेल रविराज येथे ते जेवत असताना त्यांच्यावर तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने हल्ला केला.
हल्लेखोरांकडे चाकू, कोयता अशी शस्त्रे होती. एकाच वेळी तिघा-चौघांनी त्यांच्यावर वार केल्याने काही वार त्यांच्या वर्मी लागले. त्यामुळे ते जागीच कोसळले. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात दाखल केले. पण त्यांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने तेथून सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर रात्री उशिरा शस्त्रक्रिया करण्यात आली. हॉटेलमध्ये अचानक घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली.