मुंबई बहुजननामा ऑनलाइन : मुंबईतील कोहिनूर मिल प्रकरणात झालेल्या आर्थिक घोटाळ्या प्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) तपास सुरु आहे. याआधी या मिलच्या जमिनी खरेदी प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उन्मेष जोशी यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनादेखील ईडीने गुरूवारी दुपारी चौकशीसाठी बोलावण्यात आले.
सरकारी क्षेत्रातील कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियर सर्व्हिसेसद्वारे (आयएलएफएस) मुंबईतील ‘कोहिनूर सीटीएनएल’ कंपनीला दिलेल्या ८६० कोटी रूपयांचे कर्ज आणि गुंतवणूक प्रकरणात ईडीकडून तपास सुरु आहे. ‘कोहिनूर सीटीएनएल’ हि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष जोशी याच्या मालकीची आहे. ही कंपनी दादरमधील ‘सेना भवन’ समोरील ‘कोहिनूर स्क्वेअर’ हा जुळ्या टॉवर्सचा प्रकल्प उभारत होती.
दादर येथील कोहिनुर मिलची जागा मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राजेंद्र शिरोडकर आणि उन्मेश जोशी यांनी खरेदी केली. त्यासाठी त्यांनी आयएलएफएसकडून ८६० कोटी रूपयांचे कर्ज घेतलं. मात्र या कर्जामुळे आयएलएफएसचे मोठं नुकसान झाल्याने त्यांनी कंपनीतील आपले शेअर्स विकले. आयएलएफएसकडून शेअर विकण्यात आल्यानंतर राज ठाकरे यांनी लगेच २००८ मध्ये यातील आपले सर्व शेअर्स विकले. पण कंपनीतील शेअर्स विकल्यानंतरही राज ठाकरे यांचा संबंधित कंपनीत सक्रिय सहभाग चालू होता, याच आरोपावरून ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यानंतर आता ईडीने या कोहिनुर मिल प्रकरणात मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनाही चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. ईडीने दिलेल्या नोटीसनंतर नितीन सरदेसाई चौकशीसाठी गुरूवारी दुपारी ईडी कार्यालयात हजर झाले आहेत.