नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इतर कोणत्याही गुंतवणुकीच्या पर्यायांपेक्षा पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणे नेहमीच सुरक्षित पर्याय मानला जातो. येथे आपली रक्कम सुरक्षितही राहते आणि चांगला परतावा देखील मिळतो. पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणुकीसाठी अनेक चांगल्या योजनांचा पर्याय उपलब्ध आहे. ज्यामुळे लोक आपल्या बचत, सुविधा आणि गरजेनुसार वेगवेगळ्या योजनांत गुंतवणूक करू शकतात. येथे, तुमच्या गुंतवणूकीवर सरकारी सुरक्षेची 100 टक्के हमी आहे. त्यांपैकी एक योजना म्हणजे मंथली इनकम स्कीम ( POMIS). ही एक सरकारी छोटी बचत योजना आहे. जी आपल्याला प्रत्येक महिन्याला गुंतवणुकीची संधी देते. या योजनेत गुंतवणूक करून आपण दरमहा एक निश्चित रक्कम कमवू शकता. या योजनेंतर्गत आपण एकल किंवा संयुक्त खाते उघडू शकता आणि एकमुखी रक्कम जमा करू शकता.
आपल्या गुंतवणुकीवर दरमहा होते कमाई
या खात्यात जमा झालेल्या रकमेच्या हिशेबाने आपल्या खात्यात दरमहा कमाईची रक्कम येतच राहते. ही योजना 5 वर्षांसाठी आहे. म्हणजेच त्याचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा आहे, परंतु आपल्याला हवे असल्यास तो पुढे 5-5 वर्षांपर्यंत वाढविला जाऊ शकतो. पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूकीवर कोणताही धोका नसल्याने कोणताही भारतीय नागरिक पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक करु शकतो.
या योजनेत गुंतवणूक करणे चांगला पर्याय
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक करणे अश्या लोकांसाठी फायदेशीर आहे, ज्यांना दरमहा निश्चित उत्पन्न मिळवायचे आहे. या योजनेत अतिशय सुरक्षित मार्गाने उत्पन्न होते. नोकरी सोडल्यानंतर किंवा सेवानिवृत्तीनंतर ज्यांना एकरकमी रक्कम मिळते त्यांच्यासाठी ही योजना चांगली आहे. एकरकमी गुंतवणूकीद्वारे दरमहा निश्चित उत्पन्न मिळू शकते. हप्त्यांमध्ये गुंतवणूकीऐवजी एकरकमी गुंतवणूक करून दरमहा परतावा हवा असणार्या लोकांसाठी ही एक उत्तम योजना आहे. तसेच गुंतवणुकीसाठी या पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत एकल आणि संयुक्त खाती असे दोन्ही पर्याय आहे. एकल खात्यात तुम्ही जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये गुंतवू शकता तर संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 9 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. संयुक्त खात्यात 2 ऐवजी 3 प्रौढ देखील असू शकतात. दरम्यान, गुंतवणूकीची मर्यादा केवळ 9 लाख आहे.
कसे उघडावे खाते ?
या योजनेंतर्गत खाते उघडण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणे आवश्यक आहे. खाते उघडण्यासाठी तुम्हाला आयडी पुरावा द्यावा लागेल. यासाठी तुम्हाला आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, डीएल किंवा पासपोर्ट इत्यादी कागदपत्रे दाखवावी लागतील. यासह, आपल्याला पासपोर्ट आकाराचे 2 फोटो देखील आवश्यक असतील. अॅड्रेस प्रूफसाठी एखादे ओळखपत्र, विजेचे बिल, नगरपालिका बिल, निवासी प्रमाणपत्र किंवा शासकीय विभागाने दिलेला अन्य पुरावा असावा.
फॉर्म भरताना द्यावे लागेल नॉमिनीचे नाव
या कागदपत्रांसाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसला जाऊन तेथे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचा फॉर्म भरावा लागेल. हा फॉर्म ऑनलाईन डाऊनलोड देखील केला जाऊ शकतो. आणि त्यांनतर प्रिंट करून भरू शकता. हा फॉर्म भरून आणि सर्व कागदपत्रांसह सबमिट करुन आपण हे खाते उघडू शकता. फॉर्म भरताना तुम्हाला नॉमिनीचे नावदेखील द्यावे लागेल. सुरुवातीला खाते उघडताना 1000 रुपये रोख किंवा चेकद्वारे जमा करावे लागतील.
कश्याप्रकारे मिळतो लाभ ?
सरकारने चालू तिमाहीत पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेसाठी 6.6 टक्के वार्षिक व्याज दर निश्चित केला आहे. म्हणजेच जर आपण संयुक्त खात्याद्वारे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत 9 लाख रुपये जमा केले आहेत. आता या रकमेवरील 6.6 टक्के वार्षिक व्याज दरानुसार, एकूण व्याज 59,400 रुपये होईल, जर ही रक्कम वर्षाच्या 12 महिन्यांत विभागली गेली तर प्रत्येक महिन्याचे व्याज सुमारे 4950 रुपये असेल. त्याचप्रमाणे एकाच खात्यातून तुम्ही 4,50,000 लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर दरमहा व्याज म्हणून 2475 रुपये कमवाल.