कळंब : बहुजननामा ऑनलाइन – शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर आज (मंगळवार) सकाळी 11 वाजता चाकू हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. कळंब – उस्मानाबाद विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी कळंब तालुक्यातील पडोळी (नायगाव) येथे ओमराजे गेले असताना हा हल्ला झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान हा हल्ला झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.
खा. ओमराजे हे चाकू हल्ल्यात बचावले असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रचारसभा सुरूहोण्यापुर्वी हा हल्ला झाला असून हल्ला नेमका कोणी केला, कोणत्या कारणामुळे झाला याबाबत पोलिस तपास करीत आहेत. खा. ओमराजे यांनी पोटावरचा वार हातावर घेतल्याने त्यांना किरकोळ जखम झाली असून त्यांना तात्काळ उपचारासाठी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जिल्हयातील कळंब – उस्मानाबाद विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ ते पडोळी (नायगाव) गावात रस्त्यावरून चालत जात असताना हा हल्ला झाला आहे. याबाबत उस्मानाबादमध्ये पत्रकार परिषदे घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
Visit : bahujannama.com