पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दिलेले पैसे न दिल्यावरून संमोहनतज्ञ महेश काटे यांना उद्योजक नानासाहेब गायकवाड आणि तात्याबा ढाब्याचा मालक सचिन वाळके यांनी फोनकरून बोलवून घेत त्यांचे अपहरणकरत फार्महाऊसवर नेहून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.
याप्रकरणी महेश पोपट काटे (वय 37, रा. पाली, सुधागड, मुळ गाव पिंपळे सौदागर) यांनी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नानासाहेब शंकर गायकवाड (रा. औंध), सचिन वाळके (रा. बाणेर), अंकुश राजुदादा उर्फ राजाभाऊ, विकास बालवडकर याच्यावर भादवि कलम 324, 367, 506,2 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश काटे संमोहनतज्ञ आहेत. त्यांचे औंधला उपचार केंद्र आहे. तर, सचिन वाळके हा माऊस भाऊ आहे. दरम्यान, व्यावसायासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे त्यांनी 2017 मध्ये मावसभाऊ सचिन वाळके यांच्या ओळखीने उद्योजक नाना गायकवाड 30 लाख रुपये उसने घेतले होते. त्याबदल्यात सेक्युरिटी म्हणून चार कोरे चेक दिले होते.30 लाखांपैकी 10 लाख रुपये परत केले. तर, महिन्याला 80 हजार रुपये देत होते. आतापर्यंत त्यांनी 16 लाख 80 हजार रुपये रोख स्वरूपात दिले. परंतु, आर्थिक अडचणींमुळे त्यांना उर्वरित रक्कम काही दिवसांनी देऊ असे सांगितले. परंतु, 2019 मध्ये त्यांचा व्यवसाय बंद पडला. यामुळे त्यांना पैसे देणे शक्य झाले नाही. तसेच, पैसे देण्यासाठी ते काही कालावधी मागत होते. मात्र, गायकवाड यांनी जिवे मारण्याची धमकी देऊन रायगड जिल्ह्यातील काटे यांची जमिनीचे खरेदीखत नोंदवून घेतले. तरिही त्यांची पैशाची मागणी सुरुच राहिली.
दरम्यान वाळके याने काटे यांना शुक्रवारी दीड वाजण्याच्या सुमारास बाणेर येथील तात्याचा ढाबा येथे बोलावले. तेथे त्यांना लाकडी दांडक्याने मारहाणकरून कारने सुसगाव येथील गायकवाड यांच्या फार्म हाऊसवर नेले. तसेच, डांबून काटे यांना मारहाण केली. मारहाणी दरम्यान पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत महेश काटे यांची प्रॉपर्टी घर व जमीन लिहून देण्यासाठी मारहाणकरून धमकावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास चतुश्रृंगी पोलीस करत आहेत.