Khed Shivapur Toll Plaza | खेड-शिवापूर: ‘टोलचा झोल बंद करा, रस्ताच नाही तर टोल कशाला?’
खेड-शिवापूर : Khed Shivapur Toll Plaza | पुणे- सातारा महामार्गाची (Pune Satara Highway) दुरावस्था असताना राजरोसपणे टोल वसूल करणाऱ्या महामार्ग प्राधिकरण व टोल प्रशासनाच्या विरोधात आज दि.३ खेड शिवापूर टोलनाक्यावर काँग्रेसकडून टोलबंद आंदोलन करून निषेध करण्यात आला. महामार्गाची दुरुस्ती झालीच पाहिजे, खेड-शिवापूर टोल बंद झालाच पाहिजे, अशा घोषणा देत टोलनाक्यावरून जाणारी सर्व वाहने सोडून देत टोलनाका वसुली जोपर्यंत थांबवत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा पवित्रा काँग्रेस पक्षाच्या वतीने घेण्यात आला.
पुणे- सातारा महामार्गाची दयनीय अवस्था झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदेवाडी ते कोल्हापूर पर्यंत विविध टोलनाक्यावर काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्याचप्रमाणे खेड-शिवापूर येथील टोलनाक्यावर भोरचे आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) व पुरंदरचे आमदार संजय जगताप (MLA Sanjay Jagtap) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
खेड शिवापूर टोलनाक्यावर आंदोलन करण्यसाठी आज दि.३ सकाळी १० वाजल्यापासूनच कार्यकर्त्यांची मोठी फौज जमा झाली होती. पहिल्यांदा सातारा बाजूकडील टोलवर आंदोलन करून वाहने सर्व सोडून देण्यात आली. त्यानंतर मुख्य टोलनाक्यावर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला होता.
यावेळी आमदार संग्राम थोपटे यांनी रस्ता धड नाही, तर टोल घेताच कशाला असा संतप्त सवाल करत जोपर्यंत लेखी हमी मिळत नाही, तोपर्यंत कोणताही कार्यकर्ता हटणार नसल्याची आक्रमक भूमिका घेतली.
पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी देखील यावेळी येथील स्थानिक जनतेच्या पाठीशी कायम राहणार असून टोल नाका बंदच केला पाहिजे, अशी मागणी केली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करून पुणे-सातारा महामार्गाच्या दयनीय अवस्थाबाबत संताप व्यक्त केला.
रस्ता दुरुस्तीची लेखी हमी दिली तरी रस्ता दुरुस्त होईपर्यंत टोल वसुली बंदच ठेवावी लागेल, अशी आग्रही भूमिका यावेळी आमदार थोपटे यांनी मांडली. त्यामुळे टोल प्रशासन व महामार्ग प्राधिकरणापुढे पेच निर्माण झाला, त्यामुळे सकाळी १० वाजता सुरू झालेले आंदोलन दुपारी २ वाजले तरी चालूच होते. दरम्यान, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी राजगड पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
या आंदोलनावेळी देविदास भन्साळी, शैलेश सोनवणे, लहुनाना शेलार, माऊली पांगारे, रोहन बाठे, शिवराज शेंडकर, प्रदीप पोमन, विशाल कोंडे, सुरज गदादे, तसेच भोर, वेल्हा ,मुळशी, पुरंदरचे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed.