बहुजननामा ऑनलाइन टीम – विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांना पाडणा-यांची नावे एकनाथराव खडसे यांनी पुराव्यानिशी जाहीर करावीत, असे आव्हान माजी मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना दिले आहे. शुक्रवारी दुपारी आयोजित करण्यात आलेल्या जळगावातील पत्रकार परिषदेत त्यांनी असे स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, आमच्या पक्षातील एकही आमदार हा दुसऱ्या कुणाच्या संपर्कात नाही आणि मागे भाजपामधून 12 आमदार बाहेर पडणार असल्याच्या ज्या काही अफवा पसरल्या होत्या त्यावर कुणीही विश्वास ठेऊ नये असते देखील त्यांनी स्पष्ट केले. तसेच भाजपामधील सर्वात जास्त पदे ही ओबीसींकडे असून मी स्वतः देखील ओबीसी आहे असे त्यांनी सांगितले. भाजपमधील आमदार पक्ष सोडून दुसरीकडे जाणार या निव्वळ अफवा असून पक्षात कुणीही नाराज नाही. भाजपाला सत्ता स्थापन करण्यात अपयश आले त्यामुळे या बातम्या पेरल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गिरीश महाजन पुढे म्हणाले की, कुणीच कुणाला पाडत नसते. मुक्ताईनगर मतदारसंघात एकनाथ खडसे यापूर्वी 1200 आणि त्यानंतर 8500 हजार मतांनी निवडून आले होते. यावेळी भाजपाकडून खडसे यांना तिकीट नव्हते त्यामुळे फरक पडला असे ते म्हटले. खरतर तेथे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष तिथे एकत्र आले होते. त्यामुळे तेथील लढाई ही खूप टोकाची होती आणि त्यामुळेच भाजपास अपयश आले.