Khadakwasla Assembly Election 2024 | महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री फडणवीसयांच्या जाहीर सभेला प्रचंड गर्दी; म्हणाले – ‘पुणे पालिकेतील समाविष्ट गावांना 5 वर्षे ग्रामपंचायतीनुसारच कर’

पुणे: Khadakwasla Assembly Election 2024 | राज्यात विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. २० नोव्हेंबरला मतदान असल्याने प्रचारासाठी शेवटचे दोन दिवस बाकी आहेत. दरम्यान प्रचाराला वेग आल्याचे चित्र आहे. खडकवासला मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर (Bhimrao Tapkir) यांच्या प्रचारार्थ (दि.१५) धनकवडी (Dhankawadi) येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत भव्य जाहीर सभा पार पडली.
“महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांना सोयीसुविधा पाच ते सात वर्षांनी मिळतात. मात्र, त्याआधीच गावांना मोठ्या प्रमाणात कर भरावा लागतो. आता कायद्यात बदल करून महापालिकेत समाविष्ट गावांना पहिले पाच वर्षे ग्रामपंचायतीचा कर भरावा लागेल. ज्याप्रकारे समाविष्ट गावांमध्ये सुविधा निर्माण होतील, त्यानुसार महापालिकेचे कर लावले जातील” , असे आश्वासन या सभेदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ” पुणे झोपडपट्टी मुक्त करण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात येत आहेत. राज्यात येणाऱ्या आमच्या नवीन सरकारकडून शहरात समाविष्ट होणाऱ्या भागात अधिक क्रेडिट नोटस दिले जातील. त्यातून विविध व्यवस्था निर्माण करता येतील.
२०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार आल्यानंतर वेगाने पुण्याचा चेहरामोहरा बदलणे काम केले गेले. दिल्लीनंतर पुण्यात मेट्रो करण्याचे ठरले आणि त्यासाठी स्वतंत्र महामेट्रो स्थापन करण्यात आले. देशात सर्वाधिक वेगाने पुणे मेट्रो तयार होत आहे. देशात प्रथमच स्वारगेट येथे सार्वजनिक वाहतूकव्यवस्था एकत्रित करणारी मल्टिमॉडेल हब तयार करण्यात येत आहे.
खडकवासला ते खराडी यादरम्यान मेट्रोमार्गास तीन दिवसांत आम्ही मान्यता दिली. चांदणी चौक येथे केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या नियोजनातून राज्य सरकारने भूसंपादन करून चांदणी चौकाचा कायापालट करून वाहतूक कोंडीमधून नागरिकांची सुटका केली”, असे फडणवीस यांनी म्हंटले.
या सभेवेळी आमदार भीमराव तापकीर, भाजप प्रदेश महामंत्री राजेश पांडे, माजी खासदार प्रदीप रावत, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, आरपीआय शहराध्यक्ष संजय सोनवणे, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी उपमहापौर दिलीप बराटे, दिलीप वेडे पाटील आदी उपस्थित होते.
Comments are closed.