केरळ : बहुजननामा ऑनलाईन – केरळमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने वातावरण ढवळून निघाले आहे. केरळमधील सत्तारुढ एलडीफ आघाडीचे उमेदवार एम. एम. मणी यांच्या इडुक्की येथील प्रचार सभेत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना माजी खासदार जॉयस जॉर्ज यांची जीभ घसरली. राहुल गांधींपासून मुलींनी सावध राहावे. गांधी प्रचारादरम्यान फक्त मुलींच्या कॉलेजमध्ये जातात. तिथे ते महिलांना स्नायू कसे वाकवायचे हे शिकवत आहेत. पण कृपया मुलींनी त्यांच्यासमोर सरळ उभे रहावे. त्यांनी अजून लग्न केलेल नाही, अशी आक्षेपार्ह टीका जॉर्ज यांनी गांधी यांच्यावर केली आहे.
राहुल गांधी यांनी मागच्या आठवड्यात कोचिन मधील एका महिला कॉलेजला भेट दिली होती. यावेळी त्यांनी मुलींना जपानी मार्शल आर्टचे प्रात्याक्षिक दाखवले होते. यावरून जॉर्ज यांनी गांधी यांच्यावर टीका केली आहे. केरळमधील सर्व जागांसाठी 6 एप्रिलला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने राहुल गांधी सध्या केरळ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या वेळी ते वेगवेगळ्या वयोगटातील लोकांना भेटत आहेत. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते रमेश चेन्निथला यांनी जॉर्ज यांचे हे वक्तव्य महिला आणि राहुल गांधी यांच्या विरोधात असल्याची टीका केली आहे. जॉर्ज यांच्या विरोधात तक्रार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.