Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता रखडल्याचा फक्त वाहतुकीलाच नाही तर लाखो नागरिकांच्या पाणी पुरवठ्यालाही फटका

December 28, 2024

भूसंपादनाअभावी पाईपलाईनचे काम रखडल्याने अप्पर, कोंढवा, एनआयबीएम रस्ता ते तुकाईनगरपर्यंतच्या नागरिकांना भुर्दंड

पुणे : Katraj Kondhwa Road | कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामाअभावी केवळ दक्षिण पुण्यात वाहतूक कोंडी (Traffic Jam In Pune) होत नाही. तर या रस्त्याचे काम रखडल्याने चोवीस तास पाणी पुरवठा योजनेचे (Pune Water Supply) काम देखिल रखडले आहे. यामुळे अप्पर इंदिरानगर पासून कोंढवा, एनआयबीएम रस्ता, महंमदवाडी आणि तुकाईनगरपर्यंतच्या परिसरात राहाणार्‍या लाखो नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत असल्याचे समोर येत आहे.

      महामार्गावरील वाहतूक शहराबाहेरून वळविण्यासाठी उपयुक्त असलेल्या कात्रज येथून कोंढव्यातून अगदी मंतरवाडीपर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग अत्यंत महत्वाचा आहे. परंतू अरुंद रस्ता आणि दोन्ही बाजूंना दिवसेदिवसे लोकवस्ती वाढल्याने या रस्त्यावर वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झाली आहे. प्रशासनाने पहिल्या टप्प्यात कात्रज येथील राजस सोसायटी चौक ते कोंढवा खडी मशीन चौकादरम्यानच्या सुमारे साडेतीन कि.मी. रस्त्याचे काम हाती घेतले आहे. परंतू अगोदर निविदांमधील अडचणी आणि नंतर भूसंपादनातील अडचणींमुळे या रस्त्याचे काम  अनेक वर्षे रेंगाळले आहे. सुरवातीला अगदी अडीचशे तीनशे कोटींच्या प्रकल्पाची किंम्मत आता तिपटीहून अधिक झाली आहे.

      दरम्यान, भूसंपादनाच्या अडचणीमुळे केवळ रस्त्याचे काम रेंंगाळलेले नाही तर चोवीस तास पाणी पुरवठा योजनेचे कामही रेंगाळले आहे. पाणी पुरवठा योजना रेंगाळल्यामुळे खर्च तर वाढत आहे, परंतू या पाईपलाईनवर अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या घशाला कोरड पडेल अशी परिस्थिती निर्माण होत चालली आहे. चोवीस तास पाणी पुरवठा योजनेअंतर्गत सिंहगड रस्ता परिसर, आंबेगाव, कात्रज, अप्पर इंदिरानगर, कोंढवा, सॅलसबरी पार्क, महमंदवाडीपासून अगदी तुकाईनगर परिसरात पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत. २०१६ मध्ये या टाक्यांच्या कामांना मान्यता मिळाल्यानंतर मागील तीन चार वर्षांपुर्वी या पाण्याच्या टाक्या बांधून तयार आहेत. या सर्व टाक्यांना वडगाव जलकेंद्रातून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. परंतू यापैकी सिंहगड रस्ता व कात्रज परिसरातील टाक्यांनाच पाणी पुरवठा सुरू झाला आहे.

     मात्र, अप्पर इंदिरानगर येथील दोन, एनआयबीएम परिसरातील कोणार्क इंद्रायु येथील तीन, दोराबजी मॉल जवळील तीन आणि तुकाईनगर येथील टाक्यांना पाणी पुरवठा करणार्‍या पाईपलाईनचे कात्रज कोंढवा रस्त्यावरील काम राहीले आहे. कात्रज कोंढवा रस्ता रुंदीकरण करताना रस्त्याच्या कडेने या टाक्यांकडे जाणारी पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. वडगाव जलकेंद्रापासून अगदी तुकाईनगर पर्यंत १७ ते १८ कि.मी.ची पाईपलाईन टाण्यात येणार आहे. यापैकी बहुतांश पाईपलाईनचे काम राहीले आहे. केवळ कात्रज कोंढवा रस्त्यावरील दीड कि.मी.चे काम राहील्याने पुढील टाक्या उभारल्या असल्यातरी त्यांना पाणी पुरवठा करता येणे शक्य नसल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता नंदकुमार जगताप यांनी सांगितले. कात्रज कोंढवा रस्त्याची भूसंपादनाची प्रक्रिया झाल्यानंतर रस्त्याच्या कडेच्या सर्व्हीस रस्त्याने या पाईपलाईनच्या कामाचे नियोजन असल्याचेही जगताप यांनी नमूद केले.

पाण्यासाठी नागरिकांचा ‘पाण्यासारखा’ पैसा खर्च; राजकिय पुढार्‍यांना सोयरसुतक नाही !

कोंढवा परिसर, एनआयबीएम रस्ता परिसर, महंमदवाडी जवळील तुकाईनगर पर्यंतच्या परिसरात सध्या पुर्वीच्याच पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा होत आहे. परंतू या परिसरात मोठ्याप्रमाणावर रहीवासी तसेच व्यावसायीक इमारती उभ्या राहील्या असल्याने पाण्याची कमतरता आहे. येथील मोठ्या सोसायट्यांना खाजगी टँकर चालकांकडून लाखो रुपये मोजून पाणी घेण्याशिवाय पर्याय नाही. या सोसायट्यांचे कोट्यवधी रुपये केवळ पाण्यावर खर्च झाले आहेत. परंतू काम कशामुळे आणि कोणामुळे अडले आहे? याची यत्किंचित कल्पना येथील नागरिकांना नाही. निवडणुकांमध्ये विविध प्रलोभने दाखविणारे राजकिय पुढार्‍यांना देखिल नागरिकांच्या खिशातून जाणार्‍या पैशांचे सोयरसुतक नसल्याचे यानिमित्ताने समोर येत आहे.