मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – पुण्यातील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आता करुणा धनंजय मुंडे यांनी उडी घेतली आहे. जे दिशा बरोबर झाले तेच पुजा बरोबर होणार असेल तर ‘शक्ती’ कायदा काय चाटायचा आम्ही ? असा सवाल त्यांनी फेसबुकवर केला आहे. आम्ही न्याय मागतो, भीक नाही. पूजा चव्हाण यांची आत्महत्या की हत्या याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. पूजा चव्हाण यांना न्याय भेटलाच पाहिजे, असे देखील करुणा मुंडे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
परळी येथील पूजा चव्हाण या टिकटॉक स्टारने पुण्यात आत्महत्या केली. आत्महत्येनंतर ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याचे नाव समोर आल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. राज्यात या प्रकरणावरुन मोठा गदारोळ उडाला आहे. विरोधकांनी मंत्री संजय राठोड यांच्या राजिनाम्याची मागणी करुन सरकारवर दबाव टाकला आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा मुंडे यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. पूजाला न्याय देण्यासाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
करुणा मुंडे यांनी जीवन ज्योत सामाजिक सेवा संस्थेचे काही बॅनर फेसबुकवर अपलोड केले आहेत. या संस्थेचं आपण महाराष्ट्र महिला अध्यक्ष असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच संबंधित बॅनरवर पूजा चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. आम्ही न्याय मागतो, भीक नको, असे देखील बॅनरवर म्हटलं आहे.
दरम्यान, पूजा चव्हाण यांच्या नातेवाईक शांताबाई राठोड यांनी म्हटले आहे की, पूजाने आत्महत्या केली नाही. पूजाला यवतमाळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तिथेच तिला मारले असावे आणि पुण्यातील बिल्डींगवरुन फेकले असावे. पूजा आत्महत्या करणारी मुलगी नव्हती. तिने आत्महत्या केली नाही तर तिचा घातच झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.