Kartiki Yatra Pandharpur | भाविकांसाठी आनंदाची बातमी! कार्तिकी सोहळ्यात पंढरपूरात २४ तास विठ्ठल दर्शनाची सुविधा

सोलापूर :   कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रासह विविध राज्यांतील हजारो भाविकांची पंढरपूरला मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. या यात्रेदरम्यान भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून मंदिर समितीने सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर २२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरदरम्यान विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले राहणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

कार्तिकी यात्रा २ नोव्हेंबरला आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीची पूर्वनियोजित बैठक झाली. मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज म्हणाले की, २ नोव्हेंबर रविवारी पहाटे २ वाजून २० मिनिटांनी उपमुख्यमंत्री, तसेच मानाचे वारकरी यांच्या हस्ते श्री विठ्ठल – रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे.

कार्तिकी यात्रा कालावधीत सुमारे ९ ते १० लाख भाविक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाकरिता येतात. दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिर समितीकडून आषाढी यात्रेप्रमाणेच आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती औसेकर यांनी दिली. आषाढी, कार्तिकी, माघ आणि चैत्री वारी या महत्त्वाच्या चार वाऱ्या आहेत. यापैकी महत्त्वाची असणारी दुसरी वारी म्हणजे कार्तिकी एकादशी.