कराड : बहुजननामा ऑनलाईन – कराडमध्ये कुख्यात गुंड पवन सोळवंडे याचा छातीत 9 गोळ्या घालून खून करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी मध्यरात्री हा खून झाला आहे. काही अज्ञात व्यक्तींनी पवनच्या छातीत 9 गोळ्या घालून खून केला आहे. पवन सोळवंडेवर कराड पोलीस ठाण्यातच खंडणीचा गुन्हा दाखल आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण परसले आहे.
मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास बुधवार पेठ परिसरात 4 अज्ञात हल्लेखोरांनी पवन सोळवंडेवर बेछुट गोळीबार केला. पोलिसांचा असा अंदाज आहे की, हे हल्लेखोर स्थानिकच असावेत. त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने तपास करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी यासाठी तीन वेगवेगळी तपास पथकेही तयार केली असून ती संशयितांच्या शोधासाठी रवाना झाली आहेत.
मंगळवार पेठेतील बांधकाम व्यावसायिक निहाल अल्ताफ पठाण याला खंडणी मागितल्यानंतर ती न दिल्याने त्याच्या घराच्या परिसरात पवन सोलवंडेसह अन्य चार जणांनी नंग्या तलवारीची दहशत माजवल्या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.