नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरीकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात शाहीन बाग विरोधात गोळीबार करणार्या व्यक्ती कपिल गुर्जरचे वडील यांनी दिल्ली पोलिसांच्या दाव्यावरून उलटसुलट विधान केले आहे. कपिलचे वडील गाजेसिंग गुर्जर यांनी आपल्या मुलाबद्दल म्हटले की तो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समर्थक असून त्यांनी आपल्या मुलाचे वर्णन मोदी आणि शहा यांचा सेवक असल्याचे केले आहे. एका वृत्तसंस्थेनुसार कपिलच्या वडिलांनी बुधवारी हे विधान केले असून आपल्या निवेदनात आपला मुलगा मोदी आणि शहा यांचा सेवक असल्याचा दावा केला आहे.
तर कपिल गुर्जर आम आदमी पार्टीशी संबंधित असून त्याचे वडील आणि भाऊ यांनी हे सर्व दावे फेटाळले आहेत, असा दावा मंगळवारी दिल्ली पोलिसांनी केला आहे. तसेच त्यांचे कुटुंब कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडलेले नसून आपच्या नेत्यांसोबत कपिलच्या छायाचित्रांचे चुकीचे वर्णन केले गेले असल्याचेही ते म्हणाले. पण काहीच तासांनंतर त्यांनी वेगळेच विधान केले. “माझा मुलगा पंतप्रधान मोदींचा समर्थक आहे. तो मोदी आणि शाह यांचा अनुयायी आहे,” असे गाजेसिंग म्हणाले आहेत. गाजेसिंग यांच्या म्हणण्यानुसार कपिलचा राजकारणाशी काही संबंध नाही. पण नोकरीला जाण्यासाठी एका तासाऐवजी चार तास लागतात, म्हणून शाहीन बागेत रस्ता रोखल्यामुळे ते नाराज झाले आहेत.
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, कपिलने पोलिस चौकशीत आपण आणि त्याच्या वडिलांनी २०१९ ला सुरुवातीच्या महिन्यात आम आदमी पार्टीचे सदस्यत्व घेतले होते, असे सांगितले होते. डीसीपी राजेश देव यांनी सांगितले होते की, शाहीन बागवर गोळीबार केल्याचा आरोप असलेला कपिल गुर्जरने आपल्या फोनमधून ही छायाचित्रे हटवली होती. टेक्निकल टीमच्या मदतीने हे फोटो परत घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. गुन्हे शाखेने त्याच्या घरी छापा टाकून त्याचा फोन परत मिळविला.