बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार कंगना रणौत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर कंगना शिवसेनेच्या रडारवर आली होती. यानंतर कंगना आणि शिवसेना यांच्यात अनेक आरोप-प्रत्यारोप होताना दिसले. इतकंच नाही तर अजूनही हे आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. अशात कंगना भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चाही सोशल मीडियावर सुरू होती.
भाजपचे बिहार निवडणुकीचे प्रभारी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अभिनेत्री कंगना रणौत येत्या बिहार विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारकांपैकी एक असेल ही शक्यता फेटाळली आहे. बोधगया इथं पत्रकारांसोबत संवाद साधताना एका प्रश्नाचं उत्तर देताना फडणवीसांनी याबाब खुलासा केला आहे.
‘नरेंद्र मोदी असताना दुसऱ्या स्टार प्रचारकाची गरज नाही’
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “भाजपजवळ स्वत: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. ते फार मोठे स्टार प्रचारक आहेत. नरेंद्र मोदी असताना दुसऱ्या स्टार प्रचारकाची गरज नाही” असं त्यांनी यावेळी सांगितलं.
‘मुख्यमंत्र्यांनी कंगनासोबत लढण्यात वेळ घालवण्यापेक्षा कोरोनाविरोधात लढाई करावी’
यावेळी बोलताना फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सल्ला दिला आहे की, त्यांनी कंगनासोबत लढण्यात वेळ घालवण्यापेक्षा कोरोनाविरोधात लढाई करावी. यावेळी बिहारचे कृषी मंत्री प्रेम कुमार यांच्यासह भाजपचे इतर नेतेही सहभागी झाले होते.