पुणे : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर मी आणि साथीदार सचिन अंदूरेने गोळ्या झाडल्या. अशी कबूली हत्या प्रकरणातील संशयित शरद कळसकरने दिली. त्याची न्यायवैद्याकीय चाचणी घेण्यात आली. तेव्हा चाचणीत दाभोलकर यांच्यावर गोळीबार केला अशी माहिती केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआय) दिली. याबाबत सीबीआयने मंगळवारी विशेष न्यायालयात अहवाल सादर केला.
कळसकरने काय सांगितले
कळसकरची न्यायवैद्यकीय चाचणी करण्यात आली असून या चाचणीत मी आणि अंदुरे याने डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळीबार केल्याची कबूली कळसकरने दिली आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात मी अॅड. संजीव पुनाळेकर यांची भेट घेतली होती. त्या वेळी अॅड. पुनाळेकर यांनी डॉ. दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता, असे न्यायवैद्यकीय चाचणीत सीबीआयला सांगितले, असा अहवाल सादर करण्यात आला.
फेब्रुवारी २०१९ मध्ये सीबीआयकडून विशेष न्यायलयात दाखल करण्यात आलेल्या दोषारोप पत्रासोबत न्यायवैद्याकीय चाचणीचा अहवाल जोडण्यात आला होता. सीबीआयचे विशेष सरकारी वकील अॅड. प्रकाश सूर्यवंशी यांनी मंगळवारी या अहवालाचा आधार घेऊन बाजू मांडली.