अकोला : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सन २०१८ मध्ये सहायक कक्ष अधिकारी पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून येथील डॉ. कैलास खेडेकर यांनी परीक्षेत यश मिळवत इतर मागास प्रवर्गातून राज्यातून द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. देऊळगाव मही येथील सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी दामोधर जयवंतराव खेडेकर यांचा मुलगा डॉ. कैलास खेडेकर यांची इतर मागास प्रवर्गामधून राज्यातून दुसऱ्या क्रमांकाने निवड झाली. कैलास खेडेकर यांचे प्राथमिक शिक्षण जि. प. प्राथमिक मुलांची शाळा देऊळगाव मही येथे तर माध्यमिक शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय शेगाव येथून झाले आहे. पुढे त्यांनी एस.आर.चुनावाले वैद्यकीय महाविद्यालय, चिखली येथून बीएएमएस ही वैद्यकीय शाखेतील पदवी प्राप्त केली.
सद्या ते राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत देऊळगाव राजा येथे वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. आयोगाच्या मागिल वर्षीच्या निकालामध्ये त्यांना कर निरीक्षक पदाने तीन तर हया वर्षी फक्त एका गुणाने हुलकावणी दिली. सहायक कक्ष अधिकारी पद हे मंत्रालय, मुंबई येथील वर्ग दोन चे पद आहे. ज्या वयामध्ये विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करणे सोडून देतात त्यावयात म्हणजे वयाच्या ३५ व्या वर्षी त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. कोणतेही क्लासेस न लावता वैद्यकीय अधिकारी पदाचे कामकाज, कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असतानाही अभ्यास करुन त्यांनी हे यश प्राप्त केले. ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांनी घरीच योग्य नियोजन आणि अभ्यासात सातत्य ठेवल्यास कोणतेही क्लासेस न लावताही स्पर्धा परीक्षेत यश मिळविता येऊ शकते, हे यातून सिद्ध झाले आहे.