नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर देशाचे 48 वे सरन्यायाधीस म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती नथालापती व्यंकट रमणा यांनी शनिवारी (दि. 24) शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात न्यायमूर्ती रमणा यांना मुख्य न्यायाधीश पदाची शपथ दिली. सरन्यायाधीश पदापर्यंत पोहचणारे आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे रमणा हे पहिले न्यायमूर्ती ठरले आहेत.
Justice N.V. Ramana sworn in as the Chief Justice of the Supreme Court of India at Rashtrapati Bhavan today. pic.twitter.com/eSeccJOH8R
— President of India (@rashtrapatibhvn) April 24, 2021
सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती रमणा यांच्या नावाला राष्ट्रपतींनी अगोदरच मंजुरी दिली होती. 24 मार्च रोजी न्या.शरद बोबडे यांनी न्या. रमणा यांच्या नावाची शिफारस केंद्राकडे पाठवली होती. न्यायदानाचा 45 वर्षांहून अधिक अनुभव असणारे आणि संवैधानिक प्रकरणांचे जाणकार रमणा यांचा कार्यकाळ 26 ऑगस्ट 2022 रोजी संपुष्टात येणार आहे. वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत ते पदावर राहणार आहेत. अर्थातच ते दोन वर्षांहूनही कमी काळासाठी सरन्यायाधीश पदावर राहणार आहेत.
नव्या सरन्यायाधीशांचा परिचय ?
मूळचे आंध्र प्रदेशातील असलेले सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांचे पूर्ण नाव नथापलपती वेंकट रमणा असे आहे. त्यांचा जन्म 27 ऑगस्ट 1957 रोजी आंध्रप्रदेशातील पोन्नवरम गावातील (जि. कृष्णा) एका शेतकरी कुटुंबात झाला. 10 फेब्रुवारी 1983 रोजी त्यांनी वकील म्हणून या क्षेत्रात पहिले पाऊल टाकले. त्यांनी यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे. जम्मू काश्मीरमध्ये इंटरनेट सुविधा पुरविण्याचा त्यांचा निर्णय गेल्या काही वर्षांतील सर्वात महत्त्वाच्या आणि चर्चित निर्णयांपैकी राहिला आहे.