बहुजननामा ऑनलाइन टीम – जेजुरी (संदीप झगडे) : बारामती, इंदापूर आणि पुरंदर तालुक्यात कोरोनाने हाहाकार माजवल्यानंतर जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेताच जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी या तीन तालुक्यांचा दौरा आखला आहे. 22 ऑगस्ट रोजी दिवसभरात ते तीन तालुक्यातील कोविड केअर सेंटर व प्रतिबंधित क्षेत्रांची पाहणी करणार आहेत, त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्य प्रसाद हे देखील असणार आहेत.
जिल्हाधिकारी श्री. देशमुख यांच्या दौऱ्याची सुरुवात इंदापूर येथून होणार आहे. इंदापूर येथील कोविड केअर सेंटरची ते पाहणी करणार असून तालुक्यात कोरोना रुग्णांची स्थिती, त्यांना मिळणाऱ्या सुविधा, कोविड केअर सेंटर मधील पायाभूत सुविधा, सेवा सुविधा यांची ते पाहणी करणार आहेत. यानंतर ते सणसर येथे भेट देणार असून सणसर येथील जिल्हा परिषद आरोग्य केंद्र तसेच कोरोना संशयितांची कॉंटॅक्ट ट्रेसिंगची पद्धत तसेच पायाभूत सुविधा यांची ते माहिती घेणार आहेत.
यानंतर दुपारी जिल्हाधिकारी बारामती येथील नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून सिल्वर जुबिली उपजिल्हा शासकीय रुग्णालयात भेट देणार आहेत. बारामतीत कोरोना रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना व सद्यस्थिती यांची ते माहिती घेणार आहेत. यानंतर संध्याकाळी जिल्हाधिकारी सासवड येथील कोविड केअर सेंटरला भेट देणार आहेत. तेथेही पुरंदर तालुक्यातील कोरोनावरील नियंत्रण, त्यासाठीच्या उपाययोजना यांची ते माहिती घेणार आहेत.