बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : वृत्तसंस्था – न्यायालयात सुनावणीवेळी अगदी छोटे पुरावेही ग्राह्य धरण्यात येतात. असाच काहीसा प्रकार दिल्ली उच्च न्यायालयात समोर आला. दिल्ली हायकोर्टातील न्यायाधीशांनी बलात्कार प्रकरणातील आरोपीस फक्त पीडित महिलेच्या हातावर आरोपीच्या नावाचा टॅटू कोरलेला आहे हे पाहून जामीन दिला. पीडितेने केलेल्या दाव्यानुसार, आरोपीने जबरदस्तीने आपले नाव हातावर गोंदवले होते.
याबाबत निरीक्षण नोंदवताना न्यायमूर्ती रजनीश भटनागर यांनी म्हटले की, “अशा प्रक्राराचे टॅटू गोंदवने सामान्य काम नाही. माझ्या मते असे टॅटू गोंदवणे ही एक कला आहे. त्याकरता एका विशिष्ट्य मशीनची आवश्यकता असते. त्याच्याशिवाय फिर्यादीच्या हातावर आहेत अशा प्रकारचे टॅटू कोरणे हे सोपे काम नाही.”
पीडित महिलेने सांगितले की, आरोपीने धमकी देऊन ब्लॅकमेल करुन आपल्याला शरीसंबंध ठेवण्यास भाग पाडले. हे शरीरसंबंध २०१६ ते २०१९ या काळात झाले. तर आरोपीने म्हटले की, तक्रारदार महिला विवाहित असून, ती माझ्यावर प्रेम करायची. तसेच आपण नात्यात असल्याचा दावा करायची.
दरम्यान, न्यायालयात आरोपीने बाजू मांडताना महिलेच्या हातावर गोंदलेल्या टॅटूचे फोटो दाखवले. या महिलेने आपल्यासोबत अनेक टॅटू काढले होते. आमची मैत्री फेसबुकच्या द्वारे झाली होती, मी तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याचे त्याने यावेळी सांगितले.