दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – युजीसीने देशातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या पदांमध्ये विभागवार आरक्षण रोस्टर लागू केले. याच्याविरोधात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांकडून जॉईंट फोरम फॉर अकॅडमीक अंड सोशल जस्टीस च्या माध्यमातून ३१ जानेवारी रोजी दिल्ली मध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. देशभरात या निर्णयाविरोधात एससी, एसटी, ओबीसीच्या विद्यार्थ्यांकडून आंदोलने केली जात आहेत.
जेएनयू मध्ये मंगळवारी ‘जॉइंट फोरम फॉर एकेडेमिक एंड सोशल जस्टिस’ अंतर्गत अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती, आणि ओबीसी वर्गातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जेएनयू शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली ३१ जानेवारी रोजी मंडी हाऊस ते संसद भवनापर्यंत आक्रोश मोर्चामध्ये विद्यार्थी व प्राध्यापक सामील होती. असा निर्णय घेण्यात आला. तर सर्व विद्यार्थी संघटनाही यात सहभागी होणार आहेत. विभागवार रोस्टर लागु होण्यामुळे भारतीय संविधानात दिलेले आरक्षण पुर्णपणे समाप्त होईल. त्यासोबतच सर्व आरक्षित वर्गांसाठी उच्च शैक्षणिक संस्थांचे दरवाजे नेहमीसाठी बंद होतील. लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांची भेट घेऊन यासंदर्भात लवकरात लवकर कायदा पारित करून तो लागू करण्यासंदर्भात निवेदन देण्यात येणार आहे. ३१ जानेवारी रोजी जेएनयूमधील प्राध्यापक सामूहिक रजा घेणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
या मोर्चामध्ये देशातील शेकडो संघटना जॉईंट फोरम फॉर एकेडमीक एंड सोशल जस्टीस या नावाखाली सहभागी होणार आहेत. तर ३१ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता हा मार्च मंडी हाऊस ते संसद मार्ग पर्यंत जाणार आहे.