नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठात गुरूवारी नागरिकत्व कायद्याविरूद्ध आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांमध्ये घसून एका तरूणाने पिस्तुलाने फायरिंग केली आणि तो बराच वेळ पिस्तुल नाचवत होता. या घटनेवरून राजकारण तापले आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा (जेएनयू) माजी विद्यार्थी कन्हैया कुमारने यावरून भाजपावर निशाणा साधला आहे.
कन्हैया कुमारने या घटनेबाबत ट्विट करून लिहिले आहे की, बघा ही छायाचित्र. द्वेषाने आंधाळा होऊन स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी नथूराम गोडसेने 72 वर्षांपूर्वी याच पद्धतीने गांधीजींची हत्या केली होती. कारण त्याला वाटत होते की बापू देशाचे गद्दार आहेत. आज रामाचे नाव घेऊन सत्तेत आलेले लोक नथूरामचा देश बनवत आहेत. जागे व्हा, संपूर्ण देश बरबाद होण्यापूर्वी.
गावठी कट्टा दाखवणार्या या व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्याला आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी पकडले होते. ही संपूर्ण घटना तेथे उपस्थित टेलीव्हिजनच्या पत्रकारांनी चित्रित केली आहे. फिकट रंगाची पँट आणि गडद रंगाचे जॅकेट घातलेले हा युवक पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेटच्या खालून आत गेला आणि वळून आंदोलनकर्त्यांवर ओरडला, ये लो आजादी. यात एक विद्यार्थी जखमी झाला. यानंतर जामिया परिसरात तणाव निर्माण झाला होता. घटनेच्या वेळी मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी आणि मीडियाचे लोक उपस्थित होते.
विद्यार्थी जामियातून महात्मा गांधींची समाधी राजघाट येथे जात होते. हा मार्च विद्यापीठाच्या जवळील होली फॅमिली रूग्णालयाजवळ अडविण्यात आला. विद्यार्थी याच ठिकाणी खाली बसले आणि पुलिस वापस जाओच्या घोषणा देऊ लागले. जेव्हा घोषणा सुरू झाल्या तेव्हा पोलिसांनी त्यांना शांतता राखण्यास सांगितले आणि शांततेत आंदोलन करण्यास सांगितले.
डीसीपी (दक्षिण) चिन्मय बिस्वाल यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना राजघाट येथे जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यांना वारंवार सांगितले जात होते की, आंदोलन शांततेत करा. आम्ही होली फॅमिली रूग्णालयाजवळ बॅरिकेट्स लावले होते. याच दरम्यान एक व्यक्ती गर्दीत घुसला तो कोणती तरी वस्तू हातात घेऊन नाचवत होता, जी वस्तू शस्त्रासारखी दिसत होती. जखमी विद्यार्थ्याचे नाव शादाब फारूक आहे. त्याच्या डाव्या हाताला जखम झाली आहे. त्यास रूग्णालयातून ट्रॉमा सेंटरमध्ये हलविण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या तरूणाची चौकशी सुरू आहे.