जालना : बहुजननामा ऑनलाईन – अनैतिक संबंधातून महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या ब्लँकमेलिंगला कंटाळून एका पोलीस शिपायाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना जालना येथे घडली असून विष्णू रामराव गाडेकर (३५) असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. त्यांनी विषारी औषध खाऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळते आहे. याबाबत मिळलेली अधिक माहिती अशी की, विष्णू गाडेकर हे बुलढाणा येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. ते मूळचे जाफराबाद तालुक्यातील गवासणी येथील रहिवासी असून सध्या देऊळगाव राजा येथे वास्तव्यास होते.
महिला पोलीस कर्मचारीने अनैतिक संबंधामुळे विष्णू गाडेकर यांच्याकडे वारंवार लग्नाची मागणी केली. मात्र, विष्णू गाडेकर यांचं लग्न झालेलं होतं, त्यांना एक मुलगीही होती. त्यामुळे त्यांनी लग्नाला नकार दिला. यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्याने इतर पोलीस कर्मचाऱ्याच्या मदतीने विष्णू गाडेकर यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली, असा आरोप आहे. महिला पोलीस कर्मचारी विष्णू गाडेकर यांच्याकडे नेहमी पैशांची आणि सोन्याच्या दागिन्यांची मागणी करु लागली. शिवाय, मागणी पूर्ण न केल्यास विष्णू गाडेकर आणि त्यांच्या मुलीला मारण्याची धमकीही दिली. या जाचाला कंटाळून अखेर विष्णू गाडेकर यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं, असा आरोप आहे.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा पत्नीकडून आरोप
या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी विष्णू गाडेकर यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप विष्णू गाडेकर यांच्या पत्नीने केला आहे. त्यांच्या तक्रारीवरुन जाफराबाद पोलीस ठाण्यात कलम 306, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित मोरे करत आहेत.